आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणाचे रक्षक बना, भक्षक नको

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्ग सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करायला समर्थ आहे,
निसर्गाचा आनंद घ्यायचा, तो ओरबाडायचा नाही.
- महात्मा गांधी

किती समर्पक शब्दांत महात्मा गांधींनी पर्यावरणाचे महत्त्व आपणास पटवून दिलेले आहे. ‘पर्यावरण’ म्हणजेच परि + आवरण आपल्या अवतीभवती असलेले डोंगर, दऱ्या, वनस्पती, प्राणी, पाणी, आकाश, भूमी, ऊन, वारा, पाऊस अशा सर्व संबंधित घटकांनी एकत्रितरीत्या जे आवरण निर्माण केले जाते. तेच पर्यावरण आहे. निसर्गाच्या सान्निध्यात माणूस जन्माला येतो. घडतो, आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो, त्या निसर्गातील प्रत्येक घटक हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. यातील एकही घटक जर कमी जास्त झाला त्याचे दूरगामी परिणाम सजीवांवर होतात. सर्व सजीवांचे अस्तित्व हे पर्यावरणावर अवलंबून असते. पर्यावरणाचे संतुलन हा सजीव व निर्जीव वस्तूंचा प्राण आहे. स्थळ बदलले की पर्यावरण बदलते. बदललेल्या पर्यावरणाचा सजीवांवर फार मोठा परिणाम होतो.


अविवेकी, स्वच्छंद, स्वैराचारी आणि सुखलोलूप जीवनशैलीमुळे मानवाने स्वार्थापोटी संपूर्ण जग प्रदूषित केले आहे. जगात निर्माण झालेल्या या वाढत चाललेल्या प्रदूषणाचा फार मोठा परिणाम मानवावर होत आहे. मानवाच्या विकृत वागण्यामुळे अनेक प्रकारच्या प्रदूषणाला आपणास तोंड द्यावे लागते आहे. 


बदलत्या पर्यावरण चक्रामुळे पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. आजकाल वर्षातून जेमतेम ३० ते ४० दिवस पाउस पडतो. कमी दिवसांत पडणाऱ्या पावसाला प्रचंड वेग असतो. त्यामुळे पडणारा पाऊस तितक्याच वेगाने वाहूनही जातो. तो कमी प्रमाणात जमिनीत मुरतो, त्याचा परिणाम म्हणून भू-जलाची पातळी खाली जाते.


जलप्रदूषण : वाढत्या औद्योगिकरणामुळे बरेचसे पाणी दूषित केले जाते. ते दूषित पाणी नदीमध्ये प्रक्रिया न करता सोडले जाते. तळी, नदी, किनाऱ्यावर धार्मिक विधी केले जातात व त्यातील फुले व अन्नपदार्थ नदीमध्ये फेकले जातात. मेडिकल कचरा, मेलेली जनावरे, गणपती उत्सवांतील विसर्जित मूर्ती इत्यादींमुळे नदी प्रदूषित होते. पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे नदीमधील नैसर्गिक स्रोत बंद झालेत. उद्योगातून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी, पारा, सायनाइड, निकेलयुक्त असल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार दूषित पाण्यामुळे जगामध्ये दररोज ५००० बालकांचा मृत्यू होत असतो.  


वायुप्रदूषण :  औद्योगिक क्षेत्रामधून फार मोठ्या प्रमाणावर अनेक प्रकारचे वायू हवेत सोडले जातात. प्लास्टिक कचरा, पालापाचोळा इत्यादी वस्तू जाळल्यामुळे हवेत घातक वायूंचे प्रमाण फार वाढले आहे. त्यामुळे मोठ्या शहरात व औद्योगिक वसाहतीमध्ये शुद्ध हवा मिळणे अशक्यप्राय झाले आहे.  तसेच सर्व प्रकारच्या वाहनांमधून बाहेर पडणारा वायू हा खूपच घातक ठरत आहे. जुन्या वाहनांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे वायुप्रदूषणामध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे आपल्या देशात लवकरच ऑक्सिजन देणारे बूथ रस्त्यारस्त्यात बसस्थानकावर, रेल्वेस्थानकावर ठेवावे लागणार आहेत.


ध्वनी प्रदूषण : वाहनांचे कर्कश हॉर्न, लग्न व धार्मिक समारंभातील डीजे, लाउडस्पीकर, मोटारसायकलचे नवीन प्रकारचे सायलेन्सर इत्यादी गोष्टींमुळे ध्वनी प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्याचा परिणाम मानवाच्या श्रवणशक्तीवर झाला आहे. 
प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण :  प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्लास्टिक बंदी केलेली असलेली तरी प्रभावी अंमलबजावणी नसल्यामुळे प्लास्टिकचा सर्रास वापर शहरात होताना दिसत आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, प्लास्टिक पॅकिंग मटेरियल, या सर्वांमुळे सांडपाण्याचे नाले बंद होतात व शहरामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. प्लास्टिक पिशव्यांतून केरकचरा, खराब झालेले अन्न पदार्थ रस्त्यावर फेकले जातात. 


भूमी प्रदूषण :  रासायनिक खतांच्या वापरामुळे सुपीक जमीन क्षारयुक्त झालेली आहे. तसेच पिकांवर जी रसायनयुक्त कृत्रिम जंतुनाशकांची फवारणी केली जाते, त्यामुळे ती जमीन हळूहळू नापीक होते. त्यामुळे धान्य उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत नाही.
अंतराळ प्रदूषण : जगातील अनेक देशांतून माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी अनेक सॅटेलाइट्स सोडलेले आहेत. बऱ्याचशा सॅटेलाइटचे आयुष्य हे मर्यादित असते, त्यानंतर अनेक वर्षे हे निरुपयोगी सॅटेलाइट भ्रमण करत असतात, कधी कधी ते पृथ्वीवरदेखील आदळतात. त्यामुळे अंतराळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. 


किरणोत्सर्गीय प्रदूषण : वीजनिर्मितीसाठी एक कमी खर्चाचा पर्याय म्हणून अणुभट्ट्यांची निर्मिती केली जाते, त्यामधून किरणोत्सर्जन होण्याची शक्यता असते. तसेच संरक्षण सिद्धतेसाठी घेतलेल्या अणुचाचण्या व विविध क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांमुळे सुद्धा किरणोत्सर्जन प्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


ई - कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण : आधुनिक काळामध्ये मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेट्स, इत्यादींचा वापर हा अत्यंत गरजेचा होऊन बसलेला आहे. आपल्या देशामध्ये तर कोट्यवधी लोक मोबाइलचा रोज वापर करत असतात व या वस्तू अद्ययावत करण्यासाठी वारंवार बदलल्या जातात, त्यामुळे जुन्या वस्तूंच्या ई कचऱ्याची फार मोठी समस्या देशात निर्माण झालेली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा असेल तर  आपण पुढाकार घेऊन स्वत:पासून कार्य सुरू केले पाहिजे. प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी वैयक्तिक व सामुदायिक प्रयत्न केले पाहिजेत. पाणी बचत, वाहनांचा मर्यादित वापर, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, आपल्या परिसरामध्ये वृक्ष लागवड, परिसरातील नद्यांचे संरक्षण, या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. या गोष्टी जर आपण केल्या नाहीत, तर पुढची पिढी आपणास माफ करणार नाही. 


सूर्यकांत रहाळकर,
अध्यक्ष, भारतीय जलसंस्कृती मंडळ, नाशिक शाखा.

बातम्या आणखी आहेत...