आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण दिन विशेष : ‘इंडिया’ची तहान भागवण्यासाठी ‘भारता’वर वाढताेय दबाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जगातील ६९ महानगरांची तहान भागवण्यासाठी ग्रामीण भागाच्या वाट्याचे १६ अब्ज क्युबिक मीटर पाणी दरवर्षी दिले जाते. हे पाणी अमेरिकेतील कोलरॅडो नदीतून वर्षभर वाहणाऱ्या पाण्याइतके आहे. भारतात २०५० पर्यंत महानगरांची तहान ८० टक्क्यांनी वाढणार असून ती भागवण्यासाठी ग्रामीण भागावर मोठा दबाव येईल. त्यातून ग्रामीण (भारत) व शहर (इंडिया) संघर्ष निर्माण होऊ शकतो, असा गंभीर इशारा जलतज्ज्ञांनी दिला आहे.


एन्व्हायर्नमेंटल रिसर्च लेटर्स या आंतरराष्ट्रीय पत्रिकेत यासंदर्भातला अभ्यास प्रकाशित झाला. त्यानुसार आशिया व उत्तर अमेरिका खंड शहरांच्या गरजा भागवण्यासाठी ग्रामीण भागावर अवलंबून आहेत. आशियातील शहरांची तहान वरचेवर वाढत आहे. जगातल्या २७ टक्के शहरांची तहान उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक आहे, तर १९ टक्के शहरे पाण्यासाठी ग्रामीण भागावर अवलंबून आहेत. भारतातील हैदराबादपासून जाॅर्डनमधील अम्मनपर्यंतची २१ शहरे तहान भागवण्यासाठी पूर्णपणे ग्रामीण भागात असलेल्या जल प्रकल्पांवर अवलंबून आहेत. १९६० पासून जगातल्या शहरांची लोकसंख्या चार पटीने वाढली. यातून शहरांची तहान तर वाढलीच, पण ग्रामीण व शहर असा तणावही निर्माण झाला आहे. 


२०५० पर्यंत जगातल्या शहरांची लोकसंख्या २५० पटीने वाढणार आहे. त्यामुळे पाणी संकट आणखी तीव्र होईल. शहरे ही आर्थिक अन‌् राजकीय पाॅवर सेंटर असतात. त्यामुळे त्यांना पाणी सहज प्राप्त होते. त्याउलट ग्रामीण भागातल्या सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या योजना स्थानिक गरजांशी मेळ घातलेल्या नसतात. त्यामुळे इंडिया (शहर) व भारत (ग्रामीण) यांच्यातील तणाव वाढत असल्याचे हा अभ्यास म्हणतो. 


७५ % भारतीय घरे अजूनही पिण्याच्या पाण्यापासून वंचित
- जलवायू परिवर्तनामुळे गेल्या दशकात बंगळुरू, साओपाओलो, मेलबर्न, केपटाऊन अशा शहरांना दुष्काळी झळा बसल्या. मोठ्या शहरांत यापुढेही असे संकट भेडसावत राहील. या शहरांची तहान भागवण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात पाणी वळवले जाईल. त्यातून तणाव अधिक वाढेल.
- नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या जल इंडेक्सनुसार, भारतात दरवर्षी ६० कोटी लोक तीव्र पाणीटंचाईचा सामना करतात. ७५ टक्के भारतीय घरांत अद्याप पिण्याचे पाणी पोहोचलेले नाही. भारताच्या ग्रामीण भागातील ८४ टक्के घरांना अद्यापही बंद नळातून पाणी मिळत नाही.


महाराष्ट्रात फक्त ७.७% जलसाठा, मराठवाड्यात अवघा ०.७ टक्के
गेल्या वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे दुष्काळाचे चटके साेसत असलेल्या महाराष्ट्रातील जलसाठ्यांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात फक्त ७.७ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे तहानलेल्या महाराष्ट्राला आता समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे.


गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यांतील धरणांमध्ये १८ % तर मराठवाड्यात १४ % जलसाठा हाेता. यंदा मात्र हे प्रमाण कमालीचे घटले आहे. उत्तर महाराष्ट्रात ६.४ %, पश्चिम महाराष्ट्रात ७.८ %, विदर्भातील नागपूर व अमरावती विभागात अनुक्रमे ६.२% व ७.०% जलसाठा शिल्लक आहे. सर्वात भीषण परिस्थिती आहे ती मराठवाड्यात. या विभागातील धरणांमध्ये केवळ ०.७ % पाणीसाठा आहे. त्यामुळे या भागात तीव्र पाणीटंचाईचे संकट उद‌्भवले आहे.