आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रीमंडळ स्थापन करून विद्यार्थ्यांना दिली निवडणूक प्रक्रियेची माहिती; इंगोलवस्ती खंडाळी जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी - आगामी काळात विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. निवडणूक म्हणजे काय? मोठी माणसे मतदान कसे करतात? ईव्हीएम मशीन कशी असते? मतमोजणी कशी करतात? शाई का लावतात? आणि एकूण प्रक्रिया कशी असते? असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात. त्यावेळी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक रवी चव्हाण यांनी शालेय विद्यार्थ्यांना दोन गटांत विभागत निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय सहकारी शिक्षकांना बोलून दाखवला आणि ही प्रक्रिया राबविली.

पहिली ते चौथी पर्यंतसाठी प्रत्येक वर्गासाठीची विविध पदे सांगून वर्गस्तरची निवडणूक हात वर करून घेण्यात आली. यात शिक्षण, परिपाठ, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, भोजन, माहिती तंत्रज्ञान, क्रीडा, वनमंत्री अशी पदे निवडली गेली. सोबतच त्यांची कामे सांगून जबाबदारी देण्यात आली आणि शाळेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या पदासाठी निवडणूक घ्यायची तयारी केली. या पदासाठी 9 विद्यार्थी उमेदवार इच्छुक होते. त्यांना एक दिवस प्रचार करण्यासाठी वेळ दिला.

वोटिंग मशीन ऍपद्वारे ईव्हीएम तयार करत त्यात फोटोसह उमेदवार यादी तयार करून घेतली. आज डिजिटल वर्गात प्रत्यक्ष कसे मतदान करतात हे मॉकपोल दाखवून प्रोजेक्टर ने दाखवले. ब्यालेट बटन दाबल्यानंतर पसंतीच्या उमेदवाराच्या पुढील बटन दाबल्यावर हिरवा लाईट लागतो आणि विशिष्ट आवाज होतो. हे प्रोजेक्टर वरून सर्वांना सांगून नंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू केली. शाळेतील 114 विद्यार्थ्यांनी मतदानात भाग घेतला. मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लावून दरवाज्याजवळ एका विद्यार्थ्यांस पोलीस बनवले आणि रांगेवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले. मुख्याध्यापक आबासाहेब टेकळे यांनी मार्कर पेनने बोटावर शाई लावली. रवी चव्हाण यांनी ब्यालेट युनिट सांभाळले. विद्यार्थी खूप उत्सुकतेने या प्रक्रियेत सहभागी झाले. एकूण 114 विद्यार्थ्यांनी मतदान संपल्यावर प्रोजेक्टर ने निकाल दाखवण्यात आला. यात श्वेतल सागर भडोळे इयत्ता चौथी हिस सर्वाधिक 35 मते मिळाली आणि मुख्यमंत्री म्हणून निवड जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर आदित्य जगताप व शिवराज जाधव यांना 19-19 मते पडली, म्हणून चिठ्ठी द्वारे आदित्य जगताप इयत्ता-चौथी याची उपमुख्यमंत्री म्हणून निवड केली. निवडीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला व गुलाल लावून आनंद साजरा केला. शेवटी निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मंत्र्यांचे गुलाबपुष्प देऊन मुख्याध्यापक आबासाहेब टेकळे यांनी अभिनंदन केले.

निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामे कशी करायची, शिक्षकांना मदत केव्हा करावी, शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन शिक्षक सागर भडोळे यांनी केले.
 

वेगळा अनुभव मिळाला
आज मतदान मशीन कसे काम करते आणि मोठी माणसे कसे मतदान करतात हे शाळेतील सरांनी घेतलेल्या कार्यक्रमामुळे आम्हाला समजले. आम्हाला मतदान करताना खूप मजा वाटली. वेगळा अनुभव आम्हाला मिळाला.
- सान्वी शरद काळे (विद्यार्थिनी इयत्ता-४थी)
 

आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा आनंद 
लहानपणापासून लोकशाहीचे धडे शाळेतच दिले तर विदयार्थी जागरूक नागरिक तयार होतील. मोबाईल इंटरनेटचा वापर करून आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा आम्हाला आनंद होत आहे.
- रवी चव्हाण (शिक्षक)

बातम्या आणखी आहेत...