आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्या/ सोमनाथ - वादग्रस्त २.७७ एकर जमीन रामलल्ला विराजमानला देण्यात यावी, केंद्र सरकारने मंदिर बांधकामासाठी ३ महिन्यांत ट्रस्ट स्थापन करून योजना आखावी, मशिदीसाठी केंद्र व राज्य सरकारने मुस्लिम पक्षाला शहरात ५ एकर पर्यायी जमीन द्यावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. हे निर्देश पाहता गुजरातमधील सोमनाथच्या धर्तीवर अयोध्येत रामजन्मभूमी ट्रस्ट स्थापन केला जाऊ शकतो. हा ट्रस्ट धार्मिक व सेवाभावी असेल. मंदिर बांधकामासाठी श्री रामजन्मभूमी न्यासही ट्रस्टमध्ये समाविष्ट केला जाईल. हा नवा ट्रस्ट सोमनाथ ट्रस्टच्या धर्तीवर असेल. ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा सहभागी होऊ शकतात. दोघे सध्या सोमनाथ ट्रस्टचे सदस्य आहेत. सोमनाथ ट्रस्टमध्ये चेअरमन व सचिवांसह एकूण ८ सदस्य आहेत. श्री रामलल्ला विराजमानचे वकील त्रिलोकीनाथ पांडेय यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, सोमनाथ ट्रस्टसोबतच तिरुपती देवस्थान व वैष्णोदेवी मंडळही आमच्यासमोर पथदर्शी ट्रस्ट आहेत. कोर्टाचा निकाल असा लागू शकतो या शक्यतेवर आम्ही पूर्वीच विचार केला होता. नव्या ट्रस्टमध्ये रामजन्मभूमी न्यासही समाविष्ट केला जाईल. त्याचे स्वरूप नंतर ठरेल. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेईल.
- श्री रामजन्मभूमी ट्रस्ट आगामी काळात अयोध्येतील ५ किमी क्षेत्रात असलेल्या सर्व मंदिर व मठांच्या विकासासह त्यांच्या देखभालीची जबाबदारी घेऊ शकतो. - या कक्षेत लवकुश मंदिर, राममंदिर अमांवा, रंगमहल, राम कचेहरी, इमली बगिया जगन्नाथ मंदिर, तुलसी मंदिर, सीता रसोई, कनक भवन, रत्नसिंहासन, हनुमान गढी, दंतधावन कुंड, मणि पर्वत, नागेश्वरनाथ मंदिर येतात.
- श्री सोमनाथ ट्रस्ट परिसरातील सुमारे १० किमी क्षेत्रातील ४२ मंदिरांचे व्यवस्थापन पाहतो. ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न ४० कोटी आहे. या ट्रस्टमध्ये ६०० कर्मचारी काम करतात. - सरकारने ट्रस्टला जमीन आणि उद्याने देऊन उत्पन्नाची व्यवस्था केली आहे. या मंदिराच्या उभारणीस ५ वर्ष लागले होते. सोमनाथ मंदिराच्या शिखराची उंची १५० फूट आहे. शिखरावरील कलशाचे वजन १० टन असून याचा ध्वजा २७ फूट उंच आहे.
शरयूमध्ये श्रीरामांची ४०० कोटींची भव्य मूर्ती उभारणार आहे... मंदिर त्यापेक्षाही भव्य असेल
त्रिलोकीनाथ पांडेय म्हणतात, आतापर्यंत राममंदिराचे जी प्रतिकृती तयार होती आणि ज्या आधारे शिळा तयार केल्या त्यात काहीही कमी नाही. मात्र, आता अयोध्येतील लोकांना वाटते की, ज्या वेळी ही प्रतिकृती तयार झाली तेव्हा आणि आताचा विचार करता जग खूप बदलले आहे. केंद्राने काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरसाठी केवळ ७०० कोटींचे बजेट ठेवले आहे. योगी सरकारने अगोदरच शरयू नदीत ४०० कोटींची प्रभू श्रीरामांची जगातील सर्वात उंच मूर्ती उभारण्याचे ठरवले आहे. या तुलनेत विहिंपच्या राममंदिराचा खर्च अत्यंत कमी आहे. जुन्या प्रतिकृतीसारखे मंदिर उभारण्यासाठी केवळ १४० कोटी लागणार आहेत.
१४ कोसी परिक्रमा क्षेत्राबाहेर, ३ ठिकाणी मशीद उभारणे शक्य
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार मशीद कुठे उभारली जावी, या प्रश्नावर बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी म्हणाले, ते सरकारने ठरवावे. याबाबत काहीही बोलणार नाही. कोर्टाचा निकाल आला आहे... मला अपीलही करायचे नाही. अयोध्येत १४ कोसी मार्गाबाहेर मशीद उभारण्याच्या निर्देशांनंतर कुसमाहा गाव माझ्यासमोर आले. आंबेडकर नगरकडे जाणाऱ्या मार्गावर दर्शननगरमध्ये हे गाव आहे. १४ कोसी परिक्रमा क्षेत्रात या गावाचा अगदी थोडा भाग येतो. मीर बाकी यांची मजार या गावात असल्याची श्रद्धा आहे. याशिवाय ज्या स्थानांची चर्चा आहे त्यात चिर्रा जगनपूर आणि भरदसा भागातील क्षेत्र आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.