मोलाचे मत / एक लाखावर सर्व्हिस व्होटर्सपर्यंत पोहोचणार ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका

परदेशातील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार

प्रतिनिधी

Oct 09,2019 09:16:02 AM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १ लाख १७ हजारांहून अधिक लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलिस दलांमधील जवान मतदात्यांची (सर्व्हिस व्होटर्स) नोंदणी झाली अाहे. त्यांच्यापर्यंत ‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टिम’द्वारे (ईटीपीबीएस) ऑनलाइनरीत्या मतपत्रिका पोहोचवल्या जाणार आहेत.


भारत निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या साहाय्याने ‘ईटीपीबीएस’ यंत्रणा विकसित केली आहे. लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलिस बलांमधील जवान (सर्व्हिस व्होटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आयोगाने ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.


२०१६ मध्ये पुदुचेरी विधानसभेच्या नेल्लीथोप मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा ईटीपीबीएसचा वापर झाला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही देशभरात ईटीपीबीएस वापरली गेली.


असे होते कामकाज
मतदानाच्या साधारणतः १० दिवसांपूर्वी सर्व्हिस व्होटर्सना ईटीपीबीएसद्वारे ऑनलाइन मतपत्रिका पाठवल्या जातात. लष्करी दले अथवा अन्य सर्व्हिस व्होटर्स असलेल्या सेवांतील नोडल अधिकारी सर्व्हिस व्होटर्सचे ईटीपीबीएससाठीचे अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे (डीईओ) पाठवतात. सर्व्हिस व्होटर्सची यादी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे (ईआरओ) पाठवल्यानंतर अर्जावर निर्णय घेतला जातो.


असा होतो फायदा
मतपत्रिकांचा पारंपरिक पद्धतीने पोस्टाद्वारे होणारा एका बाजूचा प्रवास वाचण्यासह निवडणूक प्रशासनावरील बराचसा ताण कमी होतो. या मतपत्रिका डाऊनलोड करून प्रिंट काढून मत नोंदवल्यानंतर विहित पद्धतीने पोस्टाने पाठवणे आवश्यक असते. त्यासाठी टपाल तिकीट लावण्याची आवश्यकता नसते.


ईटीपीबीएस कुणासाठी
- सेवेनिमित्त मतदारसंघाच्या बाहेर असलेले लष्करी, निमलष्करी दलातील जवान - केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमधील जवान. - निवडणूक कालावधीत राज्याबाहेर कर्तव्यावर असलेले राज्य शासनाच्या सशस्त्र पोलिस दलामधील जवान - जवानांबरोबर निवास करत असलेल्या त्यांच्या पत्नी - परदेशात शासकीय सेवा बजावत असलेले शासकीय सेवेतील अधिकारी- कर्मचारी


वैशिष्ट्यपूर्ण ‘ईटीपीबीएस’
ईटीपीबीएस यंत्रणेला द्विस्तरीय सुरक्षितता लाभलेली आहे - इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट डाउनलोड करण्यासाठी ओटीपी आणि पिन नंबर आवश्यक. -युनिक क्यूआर कोडमुळे पोस्टल मतपत्रिकेची सुरक्षितता राखली जाण्यासह नक्कल (डुप्लिकेशन) होणे शक्य नाही.


राज्यात सर्वाधिक सर्व्हिस व्होटर्स सातारा जिल्ह्यात
अंतिम मतदार यादीनुसार राज्यात १ लाख १७,५८१ इतके सर्व्हिस व्होटर्स आहेत. यात १ लाख १४,४९६ पुरुष, तर ३०८५ महिला आहेत. सर्वाधिक १२,६५८ सर्व्हिस व्होटर्स सातारा जिल्हा, तर सर्वात कमी ३१० पालघर जिल्ह्यात आहेत.

X