आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च शिक्षणानंतरही सोडली नाही शेतीची कास; आता बनले उद्यान पंडित!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील राजेश लक्ष्मणराव इंगळे यांनी एम. ए. हिंदी पदवी शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षेतून पुणे समाजकल्याण विभागात नोकरीची संधीही मिळाली होती. मात्र, नोकरीच्या पाठीमागे न लागता शिक्षणाचा फायदा त्यांनी आदर्श शेती पिकवणे व शेतकऱ्यांनाही ती करायला लावण्यासाठी केला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली असून मानाच्या उद्यान पंडित पुरस्कारासाठी निवड केली आहे.

वेरूळ गट नंबर ३५७ मध्ये राजेश व त्यांच्या कुटुंबीयांकडे एकूण २३ एकर शेती आहे. खुलताबाद तालुक्यात गत १७ वर्षांपासून अतिशय कमी पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिकांवर तसेच उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. पावसाचे घटते प्रमाण अधिक चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी त्यांनी सामुदायिक योजनेच्या माध्यमातून शेततळे घेतले. चार एकर मका, अडीच हेक्टर कापूस, एक एकर तूर, साडेतीन एकर अद्रक, ४० झाडे चिकू, ९५० झाडे मोसंबी, १७०० झाडे पेरू, २५ झाडे रामफळ, २०० झाडे सीताफळ, १०० झाडे शेवगा अशा बहुपीक पद्धतीतून फायद्याच्या शेतीला प्राधान्य दिले आहे. नागरिकांना आरोग्यदायी जीवन लाभावे यासाठी विषमुक्त सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी केला. कृषी तंत्रज्ञानाचा वापर, लागवडी पूर्व विक्रीचे नियोजन करून विकते तेच पिकवले. त्यांचा आदर्श पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे.

यंदा अपेक्षित उत्पन्न : खुलताबाद तालुक्यात जिल्ह्यात सर्वात कमी पर्जन्यमान झाले आहे. पण राजेश इंगळे यांनी घेतलेल्या २४ बाय २४ आकाराच्या शेततळ्यात २५ लाख लिटर पाणी संचय झाला आहे. संरक्षित सिंचनाच्या सोयीमुळे सन २०१९ या हंगामात खर्च वजा जाता फळ पिके, भाजीपाला, मका, अद्रक, डांगर, मिरची, तूर आदी शेतमाल विक्रीतून २५ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असल्याचे राजेश अभिमानाने सांगतात.

िवक्री व्यवस्थापन : सेंद्रिय भाजीपाला औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेला असता तेथे मालाला मिळणारा भाव व किरकोळ विक्रीचा भाव यामध्ये मोठी तफावत दिसून आली. त्यामुळेच स्वतःच भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करण्याचा निर्णय राजेश यांनी घेतला. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. फेसबुकवर आणि व्हाॅट्सअपच्या माध्यमातून ग्राहकांना घरपोच नैसर्गिक पिकवलेली फळे व सेंद्रिय भाजीपाला पोहोचवण्याचा व्यवसाय सुरू केला. यातून उत्पादन तर वाढेलच सोबतच निव्वळ नफ्यातही वाढ झाली आहे. मधल्या दलालीला चाप बसला.

सेंद्रिय शेतकरी गट व प्रोड्युसर कंपनी स्थापन
गावातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी इंगळे यांनी कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत वसुंधरा सेंद्रिय शेतकरी गट व ओम ऑर्गेनिक प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. शेतकरी सभासदांना प्रशिक्षण, मार्गदर्शन व क्षेत्रीय भेटी, तसेच निविष्ठा पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उत्पादित मालाची प्रतवारी करून विक्री व्यवस्थापन करण्याची सुविधाही दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...