दिव्य मराठी Q&A / मुदत संपली तरी काही काळ काळजीवाहू सरकार राहू शकते; तुमच्या मनातील शंका-प्रश्नांचे तज्ज्ञांकडून निरसन

आज विधानसभेची मुदत संपतेय. ताेपर्यंत सरकार अस्तित्वात न आल्यास काय हाेईल? जाणून घ्या 

दिव्य मराठी

Nov 08,2019 08:14:00 AM IST

अनंत कळसे,

> आज विधानसभेची मुदत संपतेय. ताेपर्यंत सरकार अस्तित्वात न आल्यास काय हाेईल?

मुदत संपली तरी नवे सरकार सत्तेत येईपर्यंत राज्यपाल सध्याच्याच सरकारला काळजीवाहू सरकार म्हणून काही काळ काम करण्याची संधी देऊ शकतात.

> काेणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा दाखल केला नाही तर काय हाेईल?

राज्यपाल आधी सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेची संधी देतील. त्यांनी असमर्थता दर्शवली तर दुसऱ्या क्रमांकावरील पक्षाला संधी मिळेल. त्यांनीही नकार दिल्यास तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावरील पक्षाला संधी द्यावी लागेल. सर्वांनीच नकार दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नसेल.

> नवीन सरकार अस्तित्वात आलेच नाही तर लगेच राष्ट्रपती राजवट लागू हाेईल?

सर्वच प्रमुख पक्षांना संधी देऊनही जर राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही तर लगेचच राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. परंतु यासाठी ८ ते १० दिवस लागू शकतात.

> राष्ट्रपती राजवट किती काळ असू शकेल?

प्रथम ६ महिने राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्यानंतर राज्यपाल सहा- सहा महिन्यांची मुदतवाढ देऊ शकतात. जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत ही राजवट राहू शकते.

> राष्ट्रपती राजवटीच्या काळात जर एखाद्या पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केल्यास त्याला संधी मिळू शकते का?

हो. एखाद्या पक्षाने बहुमत असल्याचा दावा केला तर राज्यपाल त्यांना संधी देऊ शकतात. कारण विधानसभा संस्थगित असते, रद्द नसते.

> नवीन विधानसभा अस्तित्वात आली नाही तर नवीन आमदारांना सदस्यत्वाची शपथ घेता येईल का?

निकाल लागल्यापासूनच नवीन विधानसभा अस्तित्वात आलेली आहे. नवे सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिवेशनाचा निर्णय घेऊन राज्यपालांना कळवेल. त्यानंतर राज्यपाल अधिवेशनाची तारीख घोषित करून आमदारांचा शपथविधी होऊ शकतो.


> काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची मुदत-निर्णयावर मर्यादा असतात का?

हे राज्यपालांवर अवलंबून आहे, कारण याला कोणतीही कालमर्यादा नाही. काळजीवाहू सरकार धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. ते फक्त दैनंदिन कामकाजाबाबतचेच निर्णय घेऊ शकते.


> नवीन विधानसभा अस्तित्वात येईपर्यंत मतदारसंघांचे प्रतिनिधित्व काेण करेल? जुना की नवा आमदार?

जो आमदार निवडून आलेला असेल तो. मावळत्या आमदाराचे अधिकार संपुष्टात येतील.


> काळजीवाहू सरकारमधील मंत्री, मात्र आता आमदारकी गमावलेल्यांना मंत्रिपदी राहता येईल का?

काळजीवाहू सरकार अस्तित्वात असेल तोवर त्याला मंत्रिपदी राहता येईल.

(शब्दांकन : चंद्रकांत शिंदे)

X
COMMENT