आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधीक्षकांच्या इशाऱ्यानंतरही बंदिस्त सट्टा आला खुलेआम मैदानात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव -पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना मटका, जुगार, अवैध दारू व इतर अवैध धद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, पोलिस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांनीच हप्तेखोरीसाठी अवैध धद्यांना संरक्षण देणे सुरूच ठेवले आहे. आता तर बंदिस्त असलेला सट्टा जुगार खुलेआम मैदानात सुरू असल्याचे बुधवारी 'दिव्य मराठी'ने केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले.


'दिव्य मराठी'च्या प्रतिनिधीने बुधवारी दुपारी २ वाजता शहरात सुरू असलेल्या सट्टा जुगाराबाबत पाहणी केली. यात दुपारी २ वाजता बजरंग बोगद्याजवळ टपऱ्यांजवळ खुलेआम मैदानासह झाडाखाली व जडीबुटीच्या राहुटीमध्ये सट्टा सुरू होता. त्यानंतर शनिपेठेत पाहणी केली असता तेथे तर चक्क दत्त मंदिराच्या पाठीमागे एका घरात सट्टा सुरू होता.पानटपरी, बाजारपेठेलगतही सट्टा सुरू असल्याचे दिसले. येथे काही सटोड्यांच्या चिठ्ठ्या आढळून आल्या. आंबेडकर मार्केटमध्ये मोठा सट्टा जुगार सुरू होता. एमआयडीसी तर सट्टा, जुगाराचे आगार बनले आहे. शहरात सट्टा, पट्टा व अवैध लॉटरी खुलेआम सुरू असून पाेलिसांचा धाक संपला अाहे.


रेल्वेरूळाच्या शेजारी सटाेडियांचा डेरा; दहशतीमुळे जनता, लाेकप्रतिनिधीही गप्प
जळगावातील बजरंग बाेगद्याजवळ राहुटीत खुलेअाम सट्टा खेळताना सटाेडीये. तर शेजारच्या छायाचित्रात झुडपांच्या अाडाेशाला सुरू असलेला सट्टा.


सिंधी काॅलनीतील बाबानगरात सट्टा घेताना एकास अटक
सिंधी कॉलनी भागातील बाबानगरात मोकळ्या जागेवर सट्टा घेताना एकास एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री ८.३० वाजता अटक केली. त्याच्याकडून ४५० रुपये रोख व सट्ट्याच्या चिठ्ठ्या मिळाल्या. शहरात सट्टा बंद असल्याचा दावा करीत असलेल्या पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करीत काही ठिकाणी सट्टापेढ्या सुरू आहेत. बाबानगरात नितीन ब्रह्मा हातंंगडे (रा. वाघनगर) हा सट्टापेढी चालवत होता. या पेढीवर कन्हय्या गोवर्धनदास विशू (रा.बाबानगर) हा कमिशनवर कामास होता. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर अतुल वंजारी, दिनकर खैरनार, जितेंद्र राजपुत, अशोक सनकत यांच्या पथकाने धाड टाकली. या वेळी सट्टा खेळणारे काही तरुण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. तर विशू हा पोलिसांच्या हाती लागला होता. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशू याच्याकडून रोख रक्कम व सट्ट्याच्या चिठ्ठ्या अाढळून अाल्या.


विभागीय कारवाई, अकार्यकारी पदावर बदलीचा इशारा
पोलिस अधीक्षक शिंदे यांनी पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना मटका, जुगार, अवैध दारू व इतर अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिलेले आहेत. अवैध धंदे रोखण्यास अपयशी ठरल्याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कडलग यांना अधीक्षकांनी २६ ऑक्टोबर रोजी निलंबित केले आहे. यापुढेही जे पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी अवैध धंदे नियंत्रणाच्या अनुषंगाने निष्काळजीपणा करतील, त्यांना पोलिस ठाणे प्रभारी पदावरून अकार्यकारी पदावर बदली करण्यात येईल. तसेच त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षकांनी दिला अाहे.


शहरात अनधिकृत लॉटरी सेंटर्सला ऊत
शहरात सट्टाबरोबरच आता शासनमान्य नसलेले अनधिकृत लॉटरी सेंटर सुरू झाले आहेत. शासनाला कोणत्याही प्रकारचा कर न भरता मालक स्वत:च्या रिस्कवर लॉटरी खेळवत आहेत. यात दररोज लाखोंचीउलाढाल सुरू आहे. खरे पाहता या लॉटरीमध्ये खेळणाऱ्यांना जिंकणे अशक्य आहे. अत्यल्प ग्राहक या लॉटरीत जिंकतात तर हाणामाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. शनिपेठ, बाजारपट्ट्यात अशी अनधिकृत लाॅटरी सेंटर सर्रास सुरू अाहेत.अनधिकृत लाॅटरीच्या अशा पावत्या मिळतात.

बातम्या आणखी आहेत...