आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवभाेजन याेजना सुरू हाेण्यापूर्वीच राज्य, देशात अनेक ठिकाणी मिळतेय अल्पदरात पाेटभर जेवण

2 वर्षांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्मक छायाचित्र

औरंगाबाद : शिवसेनेने निवडणुकीच्या वचननाम्यात सांगितल्याप्रमाणे १० रुपयांत पोटभर जेवणाची थाळी देण्याच्या घोषणेला नुकतीच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. हा खर्च भागवण्यासाठी प्रत्येक थाळीमागे ठेकेदाराला २५ ते ४० रुपये मिळतील. मात्र, शिवसेनेच्या आधी राज्यात आणि देशभरात एक रुपयाचेही अनुदान न घेता दहाच नव्हे, तर एक रुपयात पोटभर जेवणाचे उपक्रम सुरू आहेत. यात काही शिवसैनिकांनीच सुरू केले असून त्याचा गोरगरिबांना फायदा मिळतोय.

राज्यात पहिल्यांदा युतीचे सरकार आल्यावर १९९५ मध्येच शिवसेनेने एका रुपयात झुणका-भाकर देण्याचा उपक्रम सुरू केला. यासाठी राज्यभर मोक्याच्या ठिकाणी शिवसैनिकांना जागा देण्यात आल्या. नंतर मात्र सत्ता जाताच हा उपक्रम बंद पडला. या जागांचा गैरवापर झाल्याचे आरोप झाले. राज्याने अनुदान देऊन ही योजना सुरू केली होती.

उल्हासनगर : दोन वर्षांपासून स्वस्तात जेवण


उल्हासनगरमध्ये टीम ओमी कलानी यांच्या टीओके रसोई या उपक्रमाअंतर्गत २ वर्षांपासून १० रुपयांत पोटभर जेवण मिळत आहे. ओमी कलानी यांनी टीओके महिला बचत गटाच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला आहे. यातून बचत गटातील महिलांना रोजगार मिळाला आहे. प्रत्येक ताटामागे २ रुपये उत्पन्न बचत गटाला दिले जाते. या महिलांना भविष्यात केटरिंग सर्व्हिस सुरू करता यावी यासाठी साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

मैसूर : ८० वर्षांपासून दुपारचे जेवण फक्त १० रुपयांत

मैसूरजवळील सुलीया शहरात सरल्या उर्फ रामप्रसाद हॉटेलमध्ये गेल्या ८० वर्षांपासून विद्यार्थ्यांना १० रुपयांत दुपारचे पोटभर जेवण दिले जाते. मेंगलोर-मैसूर ही शहरे जोडणाऱ्या महामार्गावर सुंदर सरल्या यांचे हॉटेल आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुंदर यांचे वडील वेंकटरामन सरल्या १९३८ पासून २५ पैशांत थाळी देत होते, नंतर १ रुपयात तीन, दोन व नंतर एक थाळी मिळू लागली. २ वर्षांपूर्वीपर्यंत येथे ५ रुपयांत एक वेळचे जेवण मिळत होते. यात भात, सांबार, रसम, आमटी आणि ताक मिळते.

बंगळुरू : ५ रुपयांत नाष्टा, १० रुपयांत जेवण


गरिबांना स्वस्तात जेवण मिळावे यासाठी बंगळुरूत ऑगस्ट २०१७ पासून इंदिरा कँटीन सुरू करण्यात आल्या आहेत. येथे ५ रुपयांत नाष्टा, तर १० रुपयांत भरपेट जेवण मिळते. या कँटीनचा अभ्यास करून राज्यातील इतर शहरे आणि गावांमध्येही अशा पद्धतीच्या कँटीन सुरू करण्याचा कर्नाटक सरकारचा मानस आहे. या दराने विचार केला तर नाष्टा आणि दोन वेळच्या जेवणासाठी २५ रुपये खर्च होतात.

औरंगाबाद : शिवसेनेकडून १० रुपयांत शिवभोजन

औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी शहरातील मोंढा भागात १० रुपयांत पोटभर शिवभोजन सुरू करण्यात आले. यासाठी कोणतेही अनुदान नाही. दानशूरांच्या मदतीने हे जेवण दिले जाते. शिवभोजनाचा दुसरा स्टॉल रेल्वेस्टेशनला सुरू करण्यात आला.

विरार : १० रु. शाकाहारी, ३० रु. मांसाहारी जेवण

सरकारच्या १० रुपयांच्या जेवणाची वाट न पाहता विरार येथील स्नेहा राणे आणि भूमिका शिर्के महिलांनी पुढाकार घेत २२ डिसेंबरपासून सुहासिनी शिवशाही भोजनालय सुरू केले. दहा रुपयांत वरण-भात, भाजी व २ पोळ्या दिल्या जातात. आता ३० रुपयांत मांसाहारी थाळीही सुरू झाली आहे.

ठाणे : बाबा का ढाब्यात १० रुपयांत जेवण

सरकारी घोषणा सत्यात येण्यापूर्वी १७ नोव्हेंबरपासून ठाण्यातील बाजारपेठेतल्या बाबा का ढाबा या हॉटेलमध्ये १० रुपयांत पोटभर जेवण सुरू झाले आहे. ठाणे पश्चिमेकडील दिनेश मेहरोल आणि सुनील चेटोले यांनी गोरगरिबांची सेवा म्हणून हा ना नफा ना तोटा उपक्रम सुरू केला.

दिल्ली : पाच रुपयांत अटल थाली योजना

भाजपने ५ वर्षांपासून दिल्लीत स्वस्त भोजनाचा उपक्रम सुरू केला आहे, पण तो फारसा यशस्वी ठरलेला नाही. यात मेट्रोच्या कामगारांना पाच रुपयांत वरण-भात, कोशिंबीर आणि भाजी दिली जाते.

तामिळनाडूत अम्मा किचन, एक रुपयात इडली


दिवंगत मुख्यमंत्री जयललितांनी तामिळनाडूत अम्मा किचन सुरू केले. येथे एक रुपयात इडली, तीन रुपयांत सांबार राइस आणि पाच रुपयांत कर्ड राइस मिळते.
 

बातम्या आणखी आहेत...