आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Even In The Mini ministries, The Mahavikas Aghadi Is Against To BJP, Strategies For Presidential And Vice Presidential Elections For 25 Districts In January.

मिनी मंत्रालयातही भाजपविराेधात महाविकास आघाडीने थाेपटले दंड, जानेवारीत हाेणाऱ्या 25 जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्षपद निवडणुकीसाठी रणनीती

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : १०५ आमदारांचा सर्वात माेठा पक्ष असूनही भाजपला राज्यातील सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीने आता मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतूनही भाजपला खाली खेचण्यासाठी रणनीती आखली जात आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांच्या सहा जणांची एक समिती गुरुवारी स्थापन करण्यात अाआली. या समितीत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, अनिल देसाई आणि विनायक राऊत, काँग्रेसकडून मोहन जोशी, कल्याण काळे आणि राष्ट्रवादीकडून शिवाजी गर्जे यांचा समावेश आहे.

राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. या ठिकाणी ३० डिसेंबरपासून ते ५ जानेवारीदरम्यान निवडणूक हाेत आहे. या जिल्हा परिषदेत ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्यांना अध्यक्षपद, इतर दाेन पक्षांना उपाध्यक्ष व सभापतिपद असा फाॅर्म्युला आघाडीच्या नेत्यांनी ठरवला असल्याची माहिती आहे.

या २५ जिल्ह्यांत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीत अध्यक्ष- उपाध्यक्षपदाची तर पालघर, धुळे, नंदुरबार, अकाेला, वाशिम, नागपूर या जिल्ह्यात ७ जानेवारी राेजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक हाेणार आहे.

हायकमांडच्या मंजुरीनंतरच पुढील निर्णय घेणार : कल्याण काळे

काँग्रेसचे माजी आमदार तथा समितीचे सदस्य कल्याण काळे यांनी सांगितले, 'राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता पालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांतही तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. यासाठी समितीची पहिली बैठक झाली. यात फक्त प्राथमिक चर्चा झाली. दोन-तीन दिवसांत आणखी बैठका घेऊन एक मसुदा तयार केला जाईल. या मसुद्याला हायकमांडची मंजुरी मिळाल्यानंतरच महाराष्ट्र विकास आघाडी स्थानिक निवडणुकांना एकत्रित सामोरे जाईल.'

२५ पैकी १५ जि. प. आघाडीच्या ताब्यात, दहा जिल्ह्यांवर लक्ष्य

राज्यातील २५ जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाबराेबरच २३ पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापतींच्याही निवडणुका होणार आहेत. या २५ पैकी १५ जिल्हा परिषदांवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. उर्वरित १० जिल्हा परिषदांवर भाजप किंवा इतर पक्षांची सत्ता आहे. या दहाही ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडीचा अध्यक्ष, उपाध्यक्ष असावा असा निर्णय महाआघाडीने नेमलेल्या समित्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

मंत्रिमंडळ विस्तार साेमवारी; ३६ आमदारांचा शपथविधी

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर ३० डिसेंबरचा मुहूर्त सापडला आहे. त्यात काँग्रेसचे १०, राष्ट्रवादीचे १३ आणि शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेतील. समाजवादी पक्ष, स्वाभिमानी, प्रहार, पीआरपी या घटक पक्षांनाही तिन्ही पक्ष आपापल्या काेट्यातून मंत्रिपद देतील. हा साेहळा राजभवनऐवजी विधिमंडळ प्रांगणात हाेईल.

शिवसेनेकडून रवींद्र वायकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, आशिष जैस्वाल, संजय राठोड, दादा भुसे, दिवाकर रावते, अनिल परब, डॉ. राहुल पाटील, संजय शिरसाट, अनिल बाबर, शंभूराज देसाई यांना संधी मिळू शकते. राष्ट्रवादीकडून अजित पवार, दिलीप वळसे पाटील,नवाब मलिक, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मश्रीफ, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, सरोज अहिरे यांची नावे चर्चेत अाहेत. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सतेज पाटील, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, सुनील केदार, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम यांची नावे अाहेत.