आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिघडली रंग-संगत : पवारांनी ज्यांना माेठे केले त्यांनी साेडली साथ; नेते गेले तरी कार्यकर्ते शरद पवारांसाेबतच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनोद कामतकर/विठ्ठल सुतार 

सोलापूर - अनेक नेते साथ साेडून भाजप-शिवसेनेत गेले तरी राष्ट्रवादीतील तरुणाई मात्र अजूनही पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, असे चित्र दाखवण्याचा प्रयत्न मंगळवारी पवारांच्या साेलापूर दाैऱ्यात दिसून आला. ‘मी साहेबांच्या साेबत’, ‘पक्ष साेडून जाणाऱ्यांच्या विराेधात लढण्यासाठी तरुणांना संधी द्या,’ अशा मागण्यांचे फलक हाती घेऊन व टाेप्या घालून तरुण व महिला कार्यकर्त्या पवारांच्या स्वागतसाठी सज्ज हाेत्या. त्यामुळे पवारांचाही हुरूप वाढला. आधी रॅलीत उघड्या जीपमध्ये सहभागी हाेण्यास नकार देणाऱ्या पवारांनी मग उत्साही कार्यकर्त्यांचा हा हट्टही पूर्ण केला.

कार्यकर्त्यांमध्ये आलेले नैराश्य झटकण्यासाठी स्वत: पवारांनी राज्यव्यापी दाैऱ्याची आखणी केली आहे. त्याला प्रतिसादही उत्तम मिळत आहे. साेमवारी नाशिकमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मंगळवारी ते साेलापुरात आले. साेलापूरशी पवारांचे तसे जिव्हाळ्याचे नाते. ‘१९६५ मध्ये जेव्हा मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष हाेताे, तेव्हा माझ्याकडे साेलापूरची जबाबदारी हाेती,’ अशी आठवण स्वत: पवारांनी मंगळवारी करुन दिली. शहरातील चार हुतात्मा पुतळा चौकात शेकडाे कार्यकर्ते ‘आम्ही पवार साहेबांसाेबत’च्या टाेप्या घालून जमले हाेते. पक्षाचे झेंडे, फलक, बॅनरही झळकत हाेते. कार्यकर्त्यांची ही गर्दी पाहून पवार स्वत: गाडीतून उतरले आणि त्यांनी स्वागत स्वीकारले.  ढोल-ताशांच्या गजरात फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत झाले. रॅलीसाठी उघडी जीप सजवण्यात आली होती. त्यामध्ये महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष भारत जाधव उभे राहिले. आधी पवारांनी त्यात बसण्यास नकार दिला, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पुन्हा ते गाडीत बसले. चारही बाजूंनी फुलांची उधळण, पायघड्या घालून जंगी स्वागत केले.
 

बिघडली रंग-संगत : पवारांनी ज्यांना माेठे केले त्यांनी साेडली साथ
काँग्रेस पक्ष साेडून राष्ट्रवादीची उभारणी करताना शरद पवारांनी पहिली बैठक साेलापुरात घेतली. त्यावेळी अनेक दिग्गज साेबत आले. मात्र सत्ता जाताच अनेकांनी साथ साेडली. साेलापुरातीलच एका जुन्या कार्यक्रमात एकत्र दिसणाऱ्या यापैकी अनेकांनी (कृष्णधवल) आता राष्ट्रवादी साेडली. तर काही जण (गुलालात) साेडण्याच्या तयारीत आहेत.
 

शिंदे, गणपतराव देशमुखांची मात्र साेबत
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, शेकापचे आमदार गणपतराव देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेस आघाडीबरोबरच आहेत. 
 

आघाडीचे हे नेतेही पक्षांतराच्या तयारीत
काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, काँग्रेसचे भारत भालके हे भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांनी शरद पवारांशी दुरावा ठेवला आहे.
 

रणजितसिंह मोहिते
राष्ट्रवादीचे माजी खासदार, माजी आमदार, माजी प्रदेश युवक अध्यक्ष. आघाडीच्या सत्तेत मंत्रिपदही भूषवले. मात्र लाेकसभेच्या ताेंडावर पक्षांतर्गत वादाचे कारण देत भाजपात.
 

कै. हणमंतराव डोळस
ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक. दोन वेळा आमदारकी भूषवली. आज हयात नाहीत. त्यांचा वारस भाजपशी जवळीक साधलेले मोहिते पाटील ठरवणार.
 

दिलीप सोपल
‘शरद पवार म्हणजेच माझा पक्ष’ अशी भूमिका घेऊन कायम राजकारण करणारे अशी आेळख. आघाडीच्या काळात मंत्रिपदही भूषवले. आता शिवसेनेत केला प्रवेश.
 

सुनील तटकरे
अजित पवारांचे विश्वासू अशी ओळख. सिंचन घोटाळ्यामध्ये नाव. शिवसेनेचे मंत्री अनंत गितेंना पराभूत करून खासदार झाले. भाऊ व दोन पुतणे मात्र नुकतेच शिवसेनेत दाखल.
 

विजयसिंह मोहिते पाटील
राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री, खासदारकी भूषवली. विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने  पंचाईत. शरद पवारांवर टीका करत मुलाला भाजपात पाठवले. स्वत: थेट प्रवेश करणे टाळले.
 

डाॅ. पद्मसिंह पाटील
पवारांचे जवळचे नातेवाईक. राष्ट्रवादीकडून अनेक वर्षे मंत्रिपद भूषवले. मुलालाही आमदारकी, मंत्रिपद मिळाले. आता राष्ट्रवादीपासून फारकत. पुत्र राणांचा भाजपात प्रवेश.