आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात ५ जिल्ह्यांत रोज सव्वातीन लाख, तर नाशकात ३.५ लाख लिटर दुधाचे संकलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मच्छिंद्र नागरे (रा. निफाड, जि. नाशिक) यांनी दहा वर्षांपूर्वी दहा गुंठे जमीन घेत एका गाईवर गोठा सुरू केला. आता त्यांच्याकडे १४ गाई- म्हशी आहेत. ते दररोज १२५ लिटर दूध विकून ५,५०० रुपये मिळवतात. असे हजारो नागरे नाशिक जिल्ह्यात असून त्यांनी नाशिक जिल्हा समृद्ध केला आहे. दररोज किमान ३.५ लाख लिटर दूध नाशिकमध्ये संकलित केले जाते. ही सारी गोदावरी नदीची कृपा असल्याचे दिसते. दुसरीकडे हीच गोदावरी औरंगाबाद जिल्ह्यात येते तेव्हा तिची कृपा आटल्यासारखी दिसते. कारण येथे येथे फक्त १ लाख ४० हजार लिटर दूध संकलित होते. गोदावरीच्या पात्राजवळ असलेल्या परभणी, जालना, नांदेड, बीड आणि औरंगाबाद अशा ५ जिल्ह्यांत दररोज ३ लाख ३१ हजार लिटर दूध संकलन होते. महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्यात औरंगाबाद वगळता कुठलाही दूध संघ सध्या सुरू नाही. गोदावरी नदी  मराठवाड्याच्या विकासात नेमकी काय भूमिका बजावते, याची माहिती घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ टीमने गोदावरी परिक्रमा केली. त्यात अनेक बाबी समोर आल्या. 


औरंगाबादमध्ये एक लाख ४० हजार लिटर दूध संकलन
औरंगाबाद जिल्ह्यात ४६० गावांतून ३० हजार शेतकऱ्यांमार्फत १.४० लाख  लिटरदूध संकलन होतेे. गेल्या वर्षी सुमारे ९० लाखांचा नफा कमावणाऱ्या दूध संघाची एक दुग्धशाळा, ३ शीतकरण केंद्रे आहेत. गांधेलीत ५० हजार लि. क्षमतेचा प्रकल्प आहे. ४६० संस्थांच्या माध्यमातून प्रत्येकी दोन असे ९२०  तसेच संघाचे २५० अशा सुमारे १३०० जणांना रोजगार मिळतो. जेथे दूध उत्पादन अधिक तेथे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी असल्याचे  जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पाटील यांनी सांगितले.


परभणी जिल्ह्यात केवळ ३२ हजार लिटर
जायकवाडीमुळे सर्वाधिक सिंचन परभणी जिल्ह्यात (९७ हजार हेक्टर) होते. पण दूध संकलनाला त्याचा फायदा झालाच नाही. परभणी, हिंगोली जिल्ह्यात रोज फक्त ३२ हजार लिटर दूध जमा होते. बीडमध्ये एक लाख ३२, जालना २७ हजार,  नांदेड ५३ हजार असे ३ लाख ३१ हजार लिटर दूध संकलन होते.


नाशिक जिल्ह्यात ३.५० लाख लिटर दूध संकलन
नाशिक विभागात नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्याsत रोज ३४ लाख लिटर दूध संकलन होते. तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत दहा लाख लिटर दूध संकलन होते. नाशिकचे शेतकरी संतोष  कापसे यांच्याकडे ३० गायी व  म्हशी असून दररोज ७०० लिटर दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. त्यांच्या चार एकर शेतीमध्ये दोन एकरवर द्राक्षे घेतली जातात. गेल्यावर्षी त्यातून ८ लाखांचे उत्पन्न झाले.


दुधामुळे समृद्धी
मी फक्त पाच गुंठे जमीन असूनही दुग्ध व्यवसाय सुरू केला. आज आठ म्हशी आणि सहा जर्सी गायी आहेत. रोज सुमारे १२५ लिटर दूध विकून पाच ते साडेपाच हजार रुपये मिळवतो. माझी दोन्ही मुले पुण्यात इजिंनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत. दुधामुळेच ही समृद्धी आली. 
- मच्छिंद्र नागरे, शेतकरी

बातम्या आणखी आहेत...