आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मनीषा भल्ला
मदुराई - मदुराईपासून १२५ किमीवर असलेल्या रामेश्वरम मार्गावर असलेले कलईयूर हे गाव खऱ्या अर्थाने कलेचे गाव ठरले आहे. या गावाच्या नावातच “कला’ आणि “यूर’ म्हणजे गाव दडले आहे. पाककलेसाठी हे गाव जगभर प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या गावातील प्रत्येक पुरुष उत्तम स्वयंपाक करतात. आज दोन हजारांची लोकसंख्या असलेल्या या गावातील सुमारे ३०० हून अधिक कूक केवळ देशातच नव्हे, जगभरात मोठ्या हॉटेल्समध्ये काम करतात. उर्वरित पुरुष लग्न-समारंभांत स्वादिष्ट भोजन तयार करून नाव कमावत आहेत. या पुरुषांचे मासिक उत्पन्न ४० हजार ते १ लाखापर्यंत आहे.
७३ वर्षीय मुरुवेल सांगतात, ५०० वर्षांपूर्वी मासेमारी करणाऱ्या वानियार समाजाला उच्च जातीच्या लोकांनी स्वयंपाकघरात स्थान दिले. सर्वात अगोदर आर्थिकदृष्ट्या संपन्न रेडियार समाजाने आम्हाला कूक म्हणून ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात प्रत्येक पिढीत प्रत्येक मुलाने ही कला शिकून घेतली. आज मुलगा १२ वर्षांचा झाला की अनुभवी कूक त्याला १० वर्षे प्रशिक्षण देतो. २४ तासांत ६१७ डिश तयार करून गिनीज बुकात नाव नोंदवणारे नामांकित शेफ डॉ. दामू सांगतात, की कलईयूरमधील शेफ सी फूड आणि आपल्या खास मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे हा स्वयंपाक करताना ही मंडळी कोणत्याच यंत्राचा वापर करत नाहीत. सर्व काम हाताने होते. सुपरस्टार रजनीकांत असो किंवा अन्य सेलिब्रिटी, प्रत्येकाला या शेफ लोकांच्या हातचे खाण्याची तीव्र इच्छा होते.
प्रत्येक युवकाकडे रोजगार, साक्षरतेतही आघाडी
एआयएडीएमकेचे नेते आणि माजी मंत्री अनवर राजा यांनी सांगितले, ५५ देशांत एकूण २.५ कोटी तामिळ लोक राहतात आणि जेथे तामिळी आहेत तेथे कलईयूर कूक आहेतच. या गावात उच्च माध्यमिक शाळा आहे. साक्षरतेत हे गाव जिल्ह्यात दुसऱ्या स्थानी आहे. गावात प्रत्येक युवकाला रोजगार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.