आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांना खोलीमध्ये कोंडले; घरात दरोडेखोरांचा अर्धा तास धुमाकूळ, शस्त्राचा धाक दाखवून अडीच लाखांचा ऐवज लंपास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थपुरी - पहारीने घराचा दरवाजा तोडून सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्याला चाकू लावला व त्यांच्या मोबाइलमधील सिमकार्ड मोडून टाकत घरातील सर्व सदस्यांना एका खोलीत कोंडले. त्यांच्याकडील मोबाइलमधील सिमकार्ड काढून घेत दरोडेखोरांनी घरात जवळपास अर्धा तास धुमाकूळ घातला. मंगरूळ येथील पोलिस पाटलाच्या घरात शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. यात सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा जवळपास अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला.

मंगरूळ (ता. घनसावंगी) येथील पोलिस पाटील संपत खरात यांच्या घरात शनिवारी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास हा दरोडा पडला. यात चोरट्यांनी लोखंडी पहारीने त्यांच्या घराचा दरवाजा मोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील महिलेच्या गळ्याला चाकू लावून पोलिस पाटलाला धाक दाखवला व बाजूच्या खोलीत झोपलेला त्यांचा मुलगा मोहन व सुनेला आवाज देऊन दरवाजा उघडण्यास सांगितले. भीतीमुळे पोलिस पाटील संपत यांच्या पत्नीने मुलाला आवाज दिल्याने तो बाहेर आला. त्या वेळी दरोडेखोरांनी त्यालाही शस्त्राचा धाक दाखवला. दरोडेखोरांनी त्यांच्याजवळील मोबाइल हिसकावून सिमकार्ड बाहेर काढले व ते मोडून टाकले. त्यानंतर घरातील सर्वांना एका खोलीत डांबून घरातील सामानाची नासधूस करण्यास सुरुवात केली. यात घरातील किमती ऐवजाची शोधाशोध करीत दरोडेखोरांनी कपाटातून सोन्याचे नेकलेस, झुंबर, हार, असे सहा तोळे दागिने नगदी ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यात जवळपास पाऊण तास दरोडेखोरांचा घरामध्ये धुमाकूळ सुरू होता. दरोडेखोरांकडे चाकू, कुऱ्हाड, लोखंडी पहार अशी हत्यारे असल्याने खरात कुटुंबीयांनी आरडाओरड केली नाही. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एस.चैतन्य यांच्यासह परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी बांगर,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, गोंदीचे एपीआय शिवानंद देवकर, श्रीधर खडेकर, बी.व्ही.शिंदे आदींनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेमुळे मंगरूळ परिसरावर भीतीचे सावट निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्यासोबतच आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली जात आहे.
 
 

दरोडेखोर ओळखीतले? 
दरोडेखोर घरात येताच पोलिस पाटलाला धाक दाखवत ‘भय्याला उठवा’ असे म्हणाले. त्यामुळे घरात कोण कोण आहे हे दरोडेखोरांना माहीत होते. २५ ते ३० वयोगटातील हे युवक होते. शिवाय ते मराठी भाषेत बोलत होते. त्यामुळे हे दरोडेखोर परिसरातीलच असावेत असा संशय व्यक्त केला जातो आह. पोलिसांनी ठशांचे नमुने घेतले असून श्वानपथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. श्वानाने झोपडपट्टीपर्यंत माग काढला. त्या आधारावर पोलिस तपास करीत आहेत.
 

यापूर्वीही मोठा दरोडा
दोन वर्षांपूर्वी १६ ऑगस्ट २०१७ रोजी मंगरूळ येथीलच रवींद्र देशमुख यांच्या घरावर असाच दरोडा पडला होता. त्यात शस्त्राचा धाक दाखवत २५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्याचा तपास अजून लागलेला नाही. आता त्याच पद्धतीने पुन्हा दरोड्याची घटना घडल्याने पोलिसांच्या तपासकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. यात वाटमाऱ्या, बैलचोरी, घरफोडीच्या अनेक घटनांचा समावेश आहे.
 

आणखी एक घर फोडले
खरात यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दरोडेखोरांनी मंगरुळ येथील शरद नानासाहेब राखुंडे यांच्या घरात चोरी केली. यात राखुंडे यांच्या लोखंडी पेटीतील चार ग्रॅम सोन्याचे दागिने व नगदी सहा हजार रुपये लंपास केले. एकाच रात्रीत दोन घटना घडल्याने मंगरुळ गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.