आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी वातावरणामुळे पुण्यात बिघडल्या ईव्हीएम मशीन्स, ३६७ ठिकाणी बदलल्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत रविवारी रात्री व साेमवारी सकाळी पावसाळी वातावरणामुळे एकूण ३६७ ईव्हीएम मशीन खराब झाल्याने त्या बदलण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. माॅक पाेलवेळी एकूण २०४, कंट्राेल युनिट १०० व बॅलेट युनिट ५५ बदलण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशाेर राम यांनी दिली. एकूण ईव्हीएम मशीनच्या केवळ ०.५ टक्के ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या. त्यामुळे शांततेत मतदान झाल्याचा दावाही त्यांनी केला. जी ईव्हीएम मशीन बंद पडली तिच्यासह दुसरी र्इव्हीएम मशीन अशी दाेन्ही मशीन सील करण्यात येऊन त्यांची मतमाेजणी एकत्रित करण्यात येते. 

पिंपरी मतदारसंघात एक बाेगस मतदानाची तक्रार हाेती. त्यानुसार एका संशयितास ताब्यात घेऊन त्याची चाैकशी करण्यात आली असता बाेगस मतदार नसल्याचे स्पष्ट झाले. वडगावशेरी मतदारसंघात साेशल मीडियावर मतदान केंद्रातील मतदान केल्याचा एक व्हिडिआे साेशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याची तक्रार आली आहे, परंतु नेमके मतदान केंद्र अद्याप न कळल्याने कारवार्इ झालेली नाही. एखाद्या व्यक्तीचे नावावर दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केले असल्यास त्या ठिकाणी एका केंद्रावर २० बॅलेट पेपर ठेवण्यात आलेले असतात व त्याद्वारे संबंधित टेंडर मतदान करण्यात येते. परंतु त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे
 

जळगाव जिल्ह्यात ९२ ठिकाणी यंत्र बदलले

जळगाव - मतदान प्रक्रियेदरम्यान साेमवारी जळगाव जिल्ह्यात ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व कंट्राेल युनिटमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळ थांबवावी लागली. मशीन बदलण्यात आल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. जळगावसह बहुतांश मतदारसंघातील ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व कंट्राेल युनिट अशा एकूण ९२ मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे बदलण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली. जळगावातील काेल्हे विद्यालयातील मतदान केंद्रावरील यंत्रही ११० मतदानानंतर बदलले.