आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयुक्त शकधर यांनी सर्वप्रथम मांडली ईव्हीएमची कल्पना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतुल पेठकर 

नागपूर - ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनविषयी नेहमी चर्चा होत असते. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी हा विषय लावून धरला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तर निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. त्यामुळे ईव्हीएम नेहमी चर्चेत असते. पण, सर्वप्रथम १९७७ मध्ये तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त एस. एल. शकधर यांनी सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची कल्पना मांडली.

पूर्वी मतपत्रिकेच्या साहाय्याने मतदान होत असे. मतमोजणीसाठी  लागणारा वेळ आणि पारदर्शकतेचे प्रश्न यामुळे बऱ्याचदा बिकट परिस्थिती निर्माण होत असे. या प्रक्रियेत सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी १९७७ मध्ये शकधर यांनी इलेक्ट्रॉनिक यंत्राची कल्पना मांडली. १९७९ मध्ये सर्वप्रथम प्रोटो-टाइम ईव्हीएम तयार करण्यात आले. १९८०-८१ मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या संस्थांनी हे यंत्र तयार करून त्याचे सादरीकरण केले. निवडणूक आयोगाने ६ ऑगस्ट १९८० रोजी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमचे सादरीकरण केले.

जानेवारी १९८१ मध्ये बेलने ही यंत्रे बनवण्याचा प्रस्ताव दिला. १९ मे १९८२ रोजी केरळमधील परूर विधानसभा मतदारसंघात ५० मतदान केंद्रांवर ईव्हीएमचा प्रथम वापर करण्यात आला. १९८२-८३  मध्ये राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ११ विधानसभा मतदारसंघांत ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले. 
 

२५० कोटी मतदारांनी केले ईव्हीएमद्वारे मतदान
१९८४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधित्व कायद्यात सुधारणा करेपर्यंत ईव्हीएम वापरण्यावर मनाई करण्याचा निर्णय दिल्याने या यंत्राचा वापर स्थगित  करण्यात अाला. १९८८ मध्ये कायद्यात दुरुस्तीनंतर १५ मार्च १९८९ पासून ईव्हीएमचा वापर सुरू करण्यात आला. जानेवारी १९९९ मध्ये तज्ज्ञांच्या समितीच्या अहवालात एकमताने ईव्हीएम वापरण्याची शिफारस केली. २००० नंतर झालेल्या निवडणुकीत तीन लोकसभा आणि ११८ विधानसभा मतदारसंघांत ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले. आतापर्यंत २५० कोटी मतदारांनी ईव्हीएमद्वारे मतदान केले आहे. 

२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याबाबतची याचिका फेटाळल्याने यावर्षीच्या लोकसभेचे मतदानही ईव्हीएमद्वारे घेण्यात आले. 
 
 

२०१३ मध्ये प्रथम वापरले व्हीव्हीपॅट :
१४ ऑगस्ट २०१३ रोजी ‘द कंडक्ट ऑफ रूल’ १९६१ मध्ये सुधारणा करून व्हीव्हीपॅट वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ सप्टेंबर २०१३ रोजी नागालँडमधील  ५१ नोकसेन विधानसभा मतदारसंघात सर्वप्रथम व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०१३ ला दिलेल्या निर्णयानुसार  टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर वाढवण्यात आला. मे २०१७ पासून सर्व निवडणुकांमध्ये आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. आतापर्यंत १८ कोटी मतदारांनी व्हीव्हीपॅटचा वापर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...