आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच!
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत ते म्हणाले की, ''माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच!'' अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
अशा पद्धतीच्या निर्णयांनी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत
दुसऱ्या एका ट्विटमध्ये टीका करत ते म्हणाले की, "जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे 15000 कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि 15 वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील."
...तोपर्यंत आरेतील एक पानही तोडले जाणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आरेला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत याचा आढावा घेतला जात नाही तोपर्यंत हे काम सुरु राहणार नाही, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आत्ताही अंधारात काही झाडे तोडल्याची माहिती मिळत आहे. आढावा घेऊन पुढील निर्णय घेईपर्यंत आरेतील एक पानही तोडले जाणार नाही असे ते यावेळी म्हणाले होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.