Politics / अब्दुल सत्तार अखेर शिवसेनेत! मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन

अब्दुल सत्तार यांच्या पक्ष प्रवेशात ट्विस्ट, आता शिवसेनेत

Sep 03,2019 08:44:24 AM IST

मुंबई - काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अाणि माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अखेर सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडची जागा जिंकून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवत असल्याचे सांगत एका प्रकारे सिल्लोडमधून तेच शिवसेनेचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब केले. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या रथावर “आरूढ’ झालेले सत्तार भाजपत प्रवेश करतील अशीच चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसारच त्यांनी सेना प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.


लोकसभा निवडणुकीपासूनच अब्दुल सत्तार हे काँग्रेसवर नाराज होते. त्यांना तिकीट न दिल्याने त्यांनी भाजपमधून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर ते सतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्या संपर्कात होते. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील आणि विधानसभेला भाजप त्यांना उमेदवारी देईल असे म्हटले जात होते. त्यातच पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्या वेळी उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा झाली, परंतु शिवसेनेत जाण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही, पण लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले होते.


त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा शिवसेना नेत्यांच्या संपर्कात होते, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी अखेर अब्दुल सत्तार यांना ग्रीन सिग्नल दिल्यानंतर त्यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार पुन्हा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना सिल्लोडची उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीर केली. इतकेच नाही तर मराठवाड्यात अब्दुल सत्तार यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

शिवसेनेच्या कामगिरीमुळे प्रभावित झालो : सत्तार
या वेळी सत्तार म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांचा पीक विमा, कर्जमाफी अशा विविध प्रश्नांवर शिवसेना राज्यात शेतकऱ्यांसाठी चांगले काम करत आहे. खरे तर मी काँग्रेसमध्ये असताना शेतकऱ्यांसाठी लढणे ही आमची जबाबदारी होती. मात्र, ती जबाबदारी सत्तेत असूनही शिवसेनेने पार पाडली. शिवसेनेच्या या कामगिरीमुळे मी प्रभावित झालो असून त्यामुळेच शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन, असेही त्यांनी म्हटले आहे.

उमेदवारी नाही मिळाल्याने पुकारला बंड, भाजप प्रवेशास झाला विरोध

अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट नाकारल्यानंतर बंड पुकारला होता. यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा देखील केली. परंतु, इतर पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली. यानंतर त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भेट त्यांनी घेतली होती. एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादेत महा जनादेश यात्रा घेऊन आले होते, त्यावेळी ते मुख्यमंत्र्यांच्या रथामध्ये देखील बसले होते. भाजप कार्यकर्त्यांनी मात्र त्यांचा कडवा विरोध केला. ज्यावेळी ते मुख्यमंत्र्यांच्या रथामध्ये बसले तेव्हा देखील सत्तार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचा-बाची झाली. त्यानंतरच त्यांनी आता शिवसेना पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला.

X