आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लासेस मालक, शिक्षणमंत्र्यांत साटेलोटे म्हणूनच शिकवणीचा मसुदा अडगळीत :माजी शिक्षणमंत्र्यांचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोचिंग क्लासेसचे मालक व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्यानेच खासगी शिकवणी संदर्भातील मसुदा तयार असूनही पडून आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. 


या प्रकरणाकडे तावडे दुर्लक्ष करत असून आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खासगी शिकवणी मसुद्याला तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.  देशमुख म्हणाले, २०१७ मध्ये कोचिंग क्लासेसवर नेमण्यात आलेल्या समितीवर विधानसभेत चर्चा झाली. १२ लोकांच्या समितीने हा मसुदा तयार केला. २०१८ ला तावडे यांच्याकडे पाठवला होता. परंतु ते अद्याप त्याचे कायद्यात रूपांतर करू शकले नाहीत. तावडेंनी लवकर नवीन कायदा तयार करू, असे आश्वासन हिवाळी अधिवेशनात दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, असेही देशमुख म्हणाले.


सुरतसारखी घटना राज्यात घडू शकते : सुरत येथे कोचिंग क्लासला आग लागून २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात १ लाख १० हजारांवर कोचिंग क्लासेस आहेत. त्यात मुंबईत ३० ते ३५ हजार आहेत. त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. क्लासेसवर निर्बंध नाहीत. सोयी-सुविधा नाहीत. सुरतसारखी घटना महाराष्ट्रात घडू शकते. दुर्दैवाने अशी कोणती दुर्दैवी घटना घडली तर उपाययोजना करण्याची सोय शासनाकडे नाही, असा आरोपही अनिल देशमुख यांनी केला आहे.
 

मसुदा तयार होता तर देशमुख झोपले होते काय : तावडे
सुरत घटनेचा शिक्षण विभागाचा काही संबंध नाही, हे माजी शिक्षणमंत्र्यांना कळत नाही, हे दुर्दैवी आहे. शिकवणी मालकांकडून पैसे घेतल्याने मसूदा पडून आहे, असा आरोप करणारे देशमुख स्वत: शिक्षणमंत्री होते. त्यावेळी झोपा काढत होते का? मसुदा तयार आहे. मात्र, त्यात घरी शिकवणी घेणारी  सामान्य गृहिणी, गरीब विद्यार्थी भरडले गेले असते. त्यांना उद्ध्वस्त करण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे. मी पैसे घेतल्याचे त्यांनी सिद्ध करावे, असे प्रत्युत्तर तावडेंनी दिले.

बातम्या आणखी आहेत...