लाठीचा वापर हा / लाठीचा वापर हा तर गुन्हाच; मग संघाचे नेते माेकळे कसे; माजी आयपीएस सुरेश खोपडेंचा सवाल

Jan 03,2019 07:14:00 AM IST

नागपूर- लाठीचा वापर हा गुन्हा असताना आणि त्याबाबत नागपुरात तक्रार दाखल केली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांवर अद्यापही गुन्हे दाखल होत नाहीत. याविरोधात आपण लोकशाही मार्गाने लढा देऊ आणि पोलिसांना कारवाईस भाग पाडू, असा इशारा माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला.

खोपडे नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले, १८ ऑक्टोबर २०१८ रोजी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात स्वयंसेवकांनी लाठी हाती बाळगून मिरवणूक काढली. भादंविच्या कलम १५३ (अ) नुसार हा दखलपात्र गुन्हा आहे. त्याचप्रमाणे संघाने असुरी शक्तींच्या विनाशाची घोषणा केली आहे. संघाच्या दृष्टीने असुरी शक्ती म्हणजे आधुनिक विचार बाळगणारे, डावे, अंधश्रद्धावरोधी कार्यकर्ते वा पुरोगामी लोक आहेत. त्यासाठी संघाने असुरी शक्तींचा नाश करण्यासाठी बेकायदा शस्त्रांचा मोठा साठा केला आहे. याविरोधात आपण रीतसर तक्रार नागपूर पोलिसांकडे केली आहे. त्यात आरोपी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संघाचे प्रमुख मोहन भागवत व इतरांचा समावेश आहे. १९ नोव्हेंबर रोजी पोलिस ठाण्यातही तक्रार दिली. मात्र, ती घेतली नाही. गुन्हा दाखल न करण्याबाबत पोलिसांवर दबाव असल्याने आपण पोलिस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी टाळण्याचा सातत्याने प्रयत्न केला. पोलिसांच्या नाकर्तेपणाबद्दल जाब विचारणार आहोत. आपण लोकशाही मार्गाने याविरुद्ध लढा देऊ,असा इशाराही खोपडे यांनी या वेळी दिला. दरम्यान, संघाच्या स्थानिक नेत्यांनी मात्र या विषयावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

X