Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Ex MLA beaten by BJP leader in fron of Minister Girish Mahajan

भाजपमध्ये ‘लात की बात’ : मंत्र्यांसमोर माजी आमदाराला तुडवले, अमळनेरच्या प्रचारसभेत गाेंधळ

प्रतिनिधी | Update - Apr 11, 2019, 08:35 AM IST

जळगावचे भाजप उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी आयाेजित सभेत पक्षातील दाेन गटांत तुंबळ हाणामारी झाली.

 • Ex MLA beaten by BJP leader in fron of Minister Girish Mahajan

  अमळनेर - जळगावचे भाजप उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी आयाेजित सभेत पक्षातील दाेन गटांत तुंबळ हाणामारी झाली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमक्ष भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार डाॅ. बी. एस. पाटील यांच्या कानशिलात लगावली. त्यावर दाेन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर धाव घेत हाणामारी सुरू केली. यात महाजन यांनाही धक्काबुक्की झाली. पाटील यांच्यावर तर जमाव तुटूनच पडला. महाजन यांनी मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना व्यासपीठावरून खाली ढकलत डाॅ. पाटील यांची सुटका केली. काहींना मारहाणही केली. सायंकाळी ६ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी उदय वाघसह ७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.


  अशी पडली ठिणगी
  मेळाव्याला सुरुवात हाेताच वाघ समर्थकांनी ‘स्मिता वाघ आगे बढाे’ असे नारे दिले. त्यावर व्यासपीठावर बसलेले उदय वाघ यांनी डाॅ. पाटील यांच्या कानशिलात लगावली. वाघ समर्थकांनी स्टेजचा ताबा घेत डाॅ. पाटील यांना तुडवले. या मारहाणीत डाॅ. पाटील यांच्या नाकातून रक्त निघाले. महाजन व पाेलिसांनी व्यासपीठावर धाव घेत मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरले.


  वादाचे कारण काय?
  मावळते खासदार ए.टी. पाटील यांचे तिकीट कापून भाजपने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. मात्र, वाघ यांचे तिकीट रद्द करून आणले व उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे वाघ समर्थक संतप्त हाेते. त्यातच डाॅ. बी.एस. पाटील यांनी पाराेळ्यातील मेळाव्यात वाघ यांच्यावर जाेरदार टीका केली हाेती. या रागातूनच समर्थकांनी डाॅ. पाटील यांना बेदम मारले.


  वैयक्तिक वाद, पक्षाशी संबंध नाही : उन्मेष पाटील
  उदय वाघ व डाॅ. बी.एस.पाटील यांच्यातील वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला. या वादाशी पक्षसंघटना, नेते अथवा महायुतीचा काहीही संबंध नाही. घटनेनंतर मेळावा अत्यंत शांततेत पार पडला, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी दिली.


  उदय वाघ,
  भाजप जिल्हाध्यक्ष,
  भूमिका :
  यांनी मारहाण केली
  आमदार स्मिता वाघ यांच्याबाबत डाॅ. बी. एस. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अपशब्द काढले हाेते. एका महिलेचा अपमान केल्याने कार्यकर्त्यांनी राग व्यक्त केला.


  बी.एस. पाटील,
  माजी आमदार,
  भूमिका :
  यांना मारहाण झाली
  उदय वाघ खडसेंचे पाय चेपतात व स्मिता वाघ डाेके दाबतात, एवढेच म्हणालाे हाेताे. यात अश्लील काय? मतदारसंघात नाराजीमुळे स्मिता वाघ यांचे तिकीट पक्षाने कापले, माझा त्यात काहीच संबंध नाही.


  आ. स्मिता वाघ,
  भूमिका
  : भाजपने आधी तिकीट दिले व नंतर कापले.
  माजी आमदार डाॅ. बी.एस. पाटील यांनी मेळाव्याला येऊ नये, असा कार्यकर्त्यांचा सूर हाेता. कारण त्यांनी माझ्याविषयी खालच्या पातळीवरील वक्तव्य केल्याने उद्रेक झाला.


  गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री,
  भूमिका :
  गोंधळ रोखण्याचा प्रयत्न
  भाजपच्या मेळाव्यात झालेला हा प्रकार अत्यंत चुकीचा व निंदनीय आहे. डाॅ. बी.एस. पाटील यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी व्यासपीठावरून खाली ढकलले.

 • Ex MLA beaten by BJP leader in fron of Minister Girish Mahajan
 • Ex MLA beaten by BJP leader in fron of Minister Girish Mahajan

Trending