आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का ? माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान महाडिक भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. धनंजय महाडिक सुरुवातील शिवसेनेत होते, नंतर ते राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून ते खासदार झाले. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता ते भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांचा हा तिसरा पक्ष असेल.

संसदरत्न मिळवलेल्या महाडिक यांचा शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा दारुण पराभव केला. लोकसभा निकालाच्या पाचच दिवसानंतर महाडिकांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर  भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु होती.

धनंजय महाडिक आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीही चंद्रकांत पाटलांनी अनेकवेळा या मैत्रीबद्दल जाहीर भाष्य केले होते1. त्यावेळी चंद्रकांत पाटलांच्या जाहीर वक्तव्यामुळे ते महाडिकांना मदत करतात की काय असाही प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र त्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा पराभव झाला.

धनंजय महाडिक तिसऱ्या पक्षात
धनंजय महाडिक सध्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांनी यापूर्वी शिवसेनेकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. काही वर्षानंतर सदाशिवराव मंडलिक आणि शरद पवार यांच्यात बिनसल्यामुळे मंडलिकांनी राष्ट्रवादी सोडली. त्यामुळे धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत, कोल्हापूरच्या जागेवर दावा सांगितला. पण 2009 मध्ये त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीने छत्रपती संभाजीराजेंना तिकीट दिलं. त्यावेळी संभाजीराजेंचाही पराभव झाला. यानंतर राष्ट्रवादीने 2014 मध्ये धनंजय महाडिक यांना तिकीट दिले आणि ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.

बातम्या आणखी आहेत...