Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Examiner claims: Conflicts in 900 villages in the state between human and wildlife

अभ्यासकांचा दावा:मानव-वन्यप्राण्यांदरम्यान राज्यातील 900 गावांत संघर्ष

प्रतिनिधी | Update - Nov 07, 2018, 08:32 AM IST

परिणामी या गावांत येत्या काळात हा संघर्ष पराकोटीला पोहोचण्याचा धोक्याचा इशारा वन्यजीव अभ्यासकांनी दिला आहे.

 • Examiner claims: Conflicts in 900 villages in the state between human and wildlife

  नागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील टी-१ उर्फ अवनी या वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय ही मानव-वन्यप्राणी संघर्षाचा कळस गाठणारी घटना म्हणून पाहिली जाते. राज्यात सध्याच्या घडीला तब्बल ९०० गावांना मानव-वन्यप्राणी संघर्षाचा सामना करावा लागत असून गावांचे वनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या योजना कुचकामी ठरल्या आहेत. परिणामी या गावांत येत्या काळात हा संघर्ष पराकोटीला पोहोचण्याचा धोक्याचा इशारा वन्यजीव अभ्यासकांनी दिला आहे.


  टी-१ उर्फ अवनी वाघिणीच्या हत्येने राज्यातीलच मानव-वन्यप्राणी संघर्षाचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या संघर्षाचा सर्वात तीव्र केंद्रबिंदू अर्थातच विदर्भाचे क्षेत्र ठरत आहे. राज्य सरकारच्या श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीचे सदस्य असलेले वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांनी या संघर्षाचा अभ्यास करून प्रभावित गावांची माहिती घेतली आहे. राज्यातील किमान ९०० गावांना मानव-वन्यजीव संघर्षाची (वाघांचे हल्ले) समस्या भेडसावत असल्याचे रिठे यांनी सांगितले. यात राज्यातील ६ व्याघ्र प्रकल्पांच्या बफर झोनमधील ४९८ गावांचा समावेश आहे. वनक्षेत्रातील गावांचे जंगलावरील अवलंबित्व कमी करून मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना टाळण्यासाठी राज्य शासनाने श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजना लागू केली आहे. या योजनेच्या निधीतून गावांत सवलतीच्या दरात एलपीजी गॅस कनेक्शन व सिलिंडरचा पुरवठा, बायोगॅसची सोय उपलब्ध केली जाते. गुरेचराईसाठी गावांतच चारा तयार करण्याची तरतूद आहे.


  शेतांसाठी सौर कुंपण, गुरांसाठी गावातच पाण्याच्या हौदांची व्यवस्था अशा बऱ्याच तरतुदी या योजनेत असल्याने ती अत्यंत उपयुक्त असल्याचे रिठे यांनी सांगितले. मात्र, या योजनेसाठी मिळणारा निधी अत्यंत कमी असल्याने राज्यातील ९०० गावांपैकी दरवर्षी १०० ते १२५ गावे कव्हर केली जातात. या परिस्थितीत इतर गावांचे काय? या प्रश्नाचे राज्य शासनाकडे उत्तरच नाही. केंद्राकडूनही पुरेसा निधी मिळत नाही. व्याघ्र प्रकल्पांच्या बफर क्षेत्रातील गावांमध्ये निधीची तरतूद शून्य असल्याचे रिठे म्हणाले.


  निधी देता येणार नाही, हे मंत्र्यांनी मान्य करावे : श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजना चांगल्या पद्धतीने भरपूर निधीतून राबवली गेली तर राज्यातील बहुतांश मानव आणि वन्यप्राण्यांतील संघर्षाच्या घटना टाळता येतील. योजनेसाठी पुरेशा निधी देता येत नाही, हे एकदाचे मंत्र्यांनी मान्य केले पाहिजे. त्यासाठी सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा व्हायला हवा. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात हा संघर्ष पराकोटीचा गंभीर बनेल, असा इशाराही किशोर रिठे यांनी दिला आहे.


  वाघांचा थक्क करणारा वावर.. : मध्य प्रदेशातील वाघांचा भ्रमणमार्ग
  विदर्भात आहे. मध्य प्रदेशातील पेंचमधील वाघ विदर्भाच्या अनेक भागांत आल्याचे यापूर्वी दिसून आले. विदर्भातील वाघही मध्य प्रदेशातील पेंच, मंडला जिल्ह्यातील कान्हा व्याघ्र प्रकल्प व तेलंगणापर्यंत गेले आहेत. त्यांचा हा भ्रमणमार्ग खानदेशात जळगावपर्यंतही आढळून
  आला आहे.

  वनक्षेत्राजवळील इतर गावे

  बोर प्रकल्प ते अमरावती, बोर प्रकल्प ते पेंच, बोर प्रकल्प ते वरूड-एकूण १०० गावे.
  मुक्ताई-भवनी संवर्धन क्षेत्र (विदर्भ ते मराठवाडादरम्यान) : २० गावे

Trending