आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Excise Of Millions Of Entrepreneurs; But The Government's Neglect Of Farmers Rahul Gandhi's Allegation

उद्योजकांची कोट्यवधींची कर्जे माफ; पण शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्षच - राहुल गांधींचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून मोदी सरकारवर चांगलाच हल्ला केला. श्रीमंतांची कोट्यवधी रुपयांची कर्जे सरकार माफ करत आहे, त्यांच्यावर सवलतींचा वर्षाव होत आहे, पण शेतकऱ्यांसाठी मात्र काहीही केले जात नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. सरकार शेतकऱ्यांना श्रीमंत उद्योजकांपेक्षा ‘गौण’ समजत आहे, असा आरोपही त्यांनी केला.


राहुल गांधी यांनी सतराव्या लोकसभेत प्रथमच भाषण केले. शून्य प्रहरात शेतकऱ्यांच्या समस्यांचा मुद्दा उपस्थित करताना राहुल यांनी आपल्या भाषणात केरळमधील विशेषत: आपल्या वायनाड मतदारसंघातील शेतकऱ्यांचा समस्यांचा उल्लेख केला. राहुल म्हणाले की, सरकारने उद्योजकांना ४.३ लाख कोटी रुपयांच्या सवलती दिल्या तसेच त्यांची ५.५ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली, पण शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांना श्रीमंत उद्योजकांपेक्षा गौण का समजत आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.राहुल म्हणाले की, देशभरातील शेतकरी विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. केरळमधील स्थिती अत्यंत भयंकर आहे. वायनाडमध्ये अलीकडेच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांनी ज्या बँकांकडून कर्ज घेतले आहे त्यांनी वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. यामुळे केरळमध्ये १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली आहेत. सरकारने ती पूर्ण करावीत. 


राहुल गांधी यांनी आपले भाषण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी कर्नाटक आणि गो‌‌‌‌व्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही राज्यांतील आमदारांना भाजपनेच फूस लावली आहे, असा आरोप त्यांनी केला. सभापतींनी त्यांना हा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी नाकारली. 

 

शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी काँग्रेसच जबाबदार : सिंह

राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. राजनाथ म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये देत आहे. या पावलामुळे त्यांच्या उत्पन्नात २० ते २५ टक्के वाढ होईल. भाजपचे सरकार सत्तेवर येण्याआधी जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, असा दावा करून सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांच्या या स्थितीसाठी दीर्घ काळ सत्तेवर असलेला काँग्रेस पक्षच जबाबदार आहे.