राजस्थान रॉयल्स संघाचा रोमांचक विजय; रायन पराग, जोफ्रा आर्चरची फटकेबाजी

वृत्तसंस्था

Apr 26,2019 09:30:00 AM IST

कोलकाता - अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत रायन परागच्या ४७ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघावर आयपीएलच्या १२ व्या सत्रात गुरुवारी ३ गडी राखून विजय मिळवला. वरुण अॅरोनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २० षटकांत ६ बाद १७५ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात राजस्थान निर्धारित १९.२ षटकांत ७ बाद १७७ धावा काढल्या.
राजस्थानच्या परागने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत ३१ चेंडूत ५ चौकार व २ षटकार खेचत सर्वाधिक ४७ धावा ठोकल्या. अजिंक्य राहणेने २१ चेंडूत ५ चौकार व १ षटकारासह ३४ धावा काढल्या. संजू सॅमसनने २२, स्टोक्सने ११ आणि बिन्नीने ११ धावांचे योगदान दिले. जोफ्रा आर्चरने (२७*) अखेरच्या षटकांत एक चौकार व एक षटकार खेचत संघाला विजयी केले. कोलकाताकडून पीयूष चावलाने २० धावांत ३ बळी घेतले. सुनील नरेनने दोन विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, कोलकाताकडून खेळताना दिनेश कार्तिकने आयपीएल आणि टी-२० मध्ये आपली सर्वश्रेष्ठ खेळी केली. मात्र, तो आपल्या पहिल्या शतकापासून अवघ्या ३ धावा दूर राहिला. कार्तिकने ५० चेंडूंचा सामना करताना नाबाद ९७ धावांची खेळी केली. या खेळी त्याने ७ चौकार आणि ९ षटकारांचा पाऊस पाडला. नितीश राणाने २१, शुभमन गिलने १४ व आंद्रे रसेलने १४ धावा जोडल्या. सुनील नरेनने ११ धावा केल्या. राजस्थानकडून वेगवान गोलंदाज वरुण अॅरोनने २० धावांत २ बळी घेतले. ओशाने थॉमस, श्रेयस गोपाल आणि उनाडकटने प्रत्येकी एक विकेट घेतली.

X
COMMENT