विशेष मुलाखत / विरोधात असतानाही विखेंचा सरकारला 'अदृश्य पाठिंबा' - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे

पाच वर्षांत एकही सुटी नाही, चार वर्षे तर एकट्याने सभागृह चालवले : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे

विशेष प्रतिनिधी

Sep 23,2019 09:56:05 AM IST

सतीश वैराळकर : औरंगाबाद
'विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रथमच काम पाहताना गेल्या पाच वर्षांत एकही सुटी घेतली नाही. चार वर्षे तर उपाध्यक्षपदही रिक्त हाेते, त्यामुळे एकट्यानेच काम पाहिले. पीठासीन अधिकारी म्हणून काम करताना सत्ताधारी व विराेधी अशा दाेन्ही बाजूंना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अभ्यासू आमदारांना जास्तीत जास्त वेळा मुद्दे मांडण्याची संधी दिली. विराेधी आमदारांना बाेलण्यास जास्त वेळ दिला,' असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना केला. 'राधाकृष्ण विखे पाटलांचे पक्षांतर हा काही काल झालेला निर्णय नाही. ते आधीपासूनच या विचारात हाेते. म्हणूनच विराेधी बाकावर असताना त्यांचा सरकारला अदृश्य पाठिंबा असायचा,' असा गाैप्यस्फाेटही त्यांनी केला.


प्रश्न : विधानसभा अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारच्या कामाकडे कसे पाहता?
बागडे : या सरकारने अनेक चांगली कामे केली. दुष्काळग्रस्तांना मदत केली, शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून दिला. कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांना पेन्शन याेजना सुरू केली. खासगी सावकारांकडील कर्जे माफ करण्याचाही निर्णय घेतला. अशी अनेक कामे केल्यानेच आज या सरकारला जनतेतून प्रतिसाद मिळत आहे.


प्रश्न : तुम्ही प्रथमच विधानसभेचे अध्यक्षपद भूषवले, कसा अनुभव हाेता?
बागडे : या पदावरून काम करताना मी सर्वांनाच न्याय दिला. सध्या विराेधी बाकावर अनेक वर्षे सत्तेत असलेली मंडळी आहे. त्यांचा अभ्यासही दांडगा आहे. म्हणून त्यांना प्रश्न मांडण्याची जास्त संधी दिली. फडणवीस सरकारचे पहिले अधिवेशन नागपुरात झाले, तेव्हा माझी अध्यक्षपदी निवड झाली. लगेचच सरकारवर विश्वासदर्शक ठराव आला. शिवसेना िवराेधी बाकावर हाेती. राष्ट्रवादीने आधीच पाठिंब्याची भूमिका जाहीर केली हाेती. काँग्रेस-शिवसेनेकडे १०५ आमदार होते. तर भाजपकडे १२२. जेव्हा ठराव मांडण्याची वेळ आली तेव्हा शिवसेेनेने सभात्याग केला. मग विराेधात अत्यल्प सदस्य राहिले. म्हणून मी विश्वासदर्शक ठराव मंजूर केला. अधिवेशन संपल्यानंतर ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी स्वत: मला भेटून कामकाज चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल काैतुक केले.


प्रश्न : विधानसभेत कामकाज चालवताना वेळेचे गणित कसे बांधले?
बागडे : सर्वांशी चांगले वागूनही आपणावर अविश्वास ठराव आणला होता. ताे नंतर बारगळला. माझे रेकॉर्ड तपासले तर आपण वेळेचे किती अचूक गणित बांधले हे लक्षात येईल. राष्ट्रवादीला ४० टक्के, काँग्रेसला ३० टक्के आणि उर्वरित म्हणजे सर्वात कमी वेळ सत्ताधाऱ्यांना दिला. एवढा वेळ देऊनही समाधान झाले नसेल तर काय करणार?


प्रश्न : अनेकदा महत्त्वाच्या विषयावर चर्चेच्या वेळीही सभागृह रिकामे असते... दुष्काळी चर्चेच्या वेळी मुंबईत हा अनुभव ला? तुम्ही शिस्त लावली का त्यांना?
बागडे : खरे तर प्रत्येकच दिवशी अधिवेशनात आमदारांनी हजर राहिले पाहिजे. मात्र काही लाेक आपले प्रश्न मांडून झाले की निघून जातात. काही जण नुसतीच हजेरी लावतात तर काही तर येतच नाहीत. त्यांना हजेरीची सक्ती करण्याबाबत काेणताही नियम नाही. खरे तर लाखाे लाेकांनी निवडून दिल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदारांनी सभागृहात शंभर टक्के हजेरी लावलीच पाहिजे, मात्र ते लावत नाहीत. दुष्काळाच्या चर्चेच्या वेळीही मराठवाडा, विदर्भातील आमदारांनी हजर राहायला हवे हाेते. पण तसे झाले नाही.


प्रश्न : विराेधी बाकावरील नेते सत्ताधारी बाकावर आल्यावर काही बदल हाेताे का?
बागडे : या पाच वर्षात तीन विराेधी पक्षनेते झाले. आधी शिवसेनेचे एकनाथ शिंदे. मात्र काही दिवसांतच त्यांचा पक्ष सत्तेत सामील झाला अन‌् ते मंत्री झाले. नंतर चार-साडेचार वर्षे विखे पाटील या पदावर हाेते. आता तेही सत्तेत आले आहेत. त्यांच्या जागी आता काँग्रेसने वडेट्टीवार यांना हे पद दिले. वडेट्टीवारांना फारच कमी काळ मिळाला. विखे पाटील आता सत्ताधारी बाकावर आले असले तरी हा निर्णय काही काल झालेला नाही. अनेक दिवसांपासून त्यांच्या मनात ते हाेते. म्हणूनच विराेधी पक्षनेते असतानाही ते सरकारला एक प्रकारे मदतच करायचे.


प्रश्न : आमदारांचे राजीनामे मंजूर करण्याचा तुम्ही विक्रम केलाय म्हणे?
बागडे (हसत) : गेल्या चार-पाच महिन्यांत २४ आमदारांनी राजीनामे दिले. त्यापैकी काहींनी लाेकसभेवर निवडून दिल्याने राजीनामे दिले, तर पक्षांतरासाठी गेल्या एक- दाेन महिन्यांत १५ ते १६ जणांनी राजीनामे दिलेत.


प्रश्न : या वेळीही निवडणूक लढवणार का?
बागडे : हाेय. पक्षाने तशी सूचना केली आहे.


प्रश्न : मग पुढच्या सरकारमध्ये तुमची काय भूमिका असेल? मंत्रिपद की अध्यक्षच.
बागडे : पक्ष देईल ती जबाबदारी घेऊ. खरे तर या सरकारमध्येही मला मंत्रीच करणार हाेते व गिरीश बापट यांना अध्यक्ष. पण बापट म्हणाले, बागडेजी, तुम्ही १९९५ मध्ये मंत्री हाेतात. मी अजून एकदाही मंत्री झालाे नाही. मला एकदा संधी द्यावी. त्यांची विनंती मान्य करून बागडेंना मंत्रिपद व मला अध्यक्षपद देण्यात आले.


प्रश्न : कुठले मंत्री अभ्यासू वाटले? विरोधी पक्षात कोण अधिक भावले?
बागडे : मंंत्र्यांची सभागृहाबद्दलची बांधिलकी चांगली राहिली. मुख्यमंत्री अनेक वेळा बाजी मारायचे. एखादा मंत्री अनुपस्थित राहिल्यास अनेक वेळा मुख्यमंत्री त्या विभागाच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे. त्यांच्याशिवाय सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनीही चांगले काम केले. एखादा अपवाद वगळता कधी प्रश्न राखून ठेवण्याची वेळ सरकारवर आली नाही. विरोधी पक्षात काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचा अभ्यास चांगला आहे. परंतु वक्तृत्वशैली नसल्यामुळे ते सभागृहात आपला ठसा उमटू शकले नाहीत. परंतु अनेक वर्षे सत्तेत असलेली मंडळी विराेधी बाकावर असल्यामुळे त्यांच्याकडेही अनेक प्रश्नांची जाण असलेले अभ्यासू सदस्य आहेत.

X
COMMENT