आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रेत चेन चोरीस गेली, लोकांनी वर्गणीतून दिले दीड लाख रुपये, महिला म्हणाली-यातून सीसीटीव्ही बसवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - राजस्थानमधील जोधपूरजवळील खेजडली येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. यंदा यात्रेत पारसीदेवी या महिलेची सुमारे चार तोळ्यांची सोन्याची चेन चोरीस गेली. हा गावकरी आणि त्यांच्या यात्रेच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न होता. यामुळे यात्रेतील प्रत्येक व्यक्तीने काही ना काही वर्गणी गोळा केली. बिष्णोई समाजाने पैसे गोळा करण्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. बघता बघता १.५१ लाख रुपये गोळा झाले. 


नंतर हे पैसे सोन्याची चेन चोरीस गेलेल्या पारसीदेवी यांना देण्यात आले. मात्र, पारसीदेवी आणि त्यांच्या पतीने त्यात आणखी ५ हजारांची भर घालून पैसे परत केले. हे दांपत्य म्हणाले - या पैशांतून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, म्हणजे पुढे कधी चोरी होणार नाही. 


दाेन दिवसांपूर्वी हा प्रसंग घडला. पैसे मंदिर ट्रस्टला सोपवण्यात आले. लगेचच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे कामही सुरू झाले आहे. या कामासाठी २ लाखांचा खर्च येणार आहे. बाकीचे पैसे बिष्णोई समाजातून उभारले जात आहेत. खेजडलीची ही यात्रा १७०३ झाडांना वाचवण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या ३६३ लोकांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित केली जाते. 


यात्रेवर लोकांचा इतका विश्वास आहे की बिष्णोई समाजातील महिला नखशिखांत दागिन्यांनी सजून येतात. गावातील बाबूराम बाबल म्हणाले, आजवर यात्रेत एका टाचणीचीही चोरी झाली नव्हती. चोरीच्या पहिल्याच घटनेत सोन्याची चेन लंपास करण्यात आली. हा आमच्यासाठी एक इशाराच होता. यामुळे आम्ही तत्काळ पाऊल उचलले. पारसीदेवीचे पती छगनलाल म्हणाले, आमचे कुटुंब सधन आहे. सोन्याची चेन ही मोठी बाब नव्हे. पैशांचीही कमतरता नाही. यामुळे समाजाने आस्था कायम ठेवण्यासाठी जी वर्गणी उभारली त्यात आणखी भर घातली जावी. जेणेकरून सुरक्षेचा कायमस्वरूपी बंदोबस्त होईल. भविष्यात अशी घटना घडलीच तर चोराला पकडता येईल. 


यात्रेवर ५० वर्षांपेक्षा जास्त काळ विश्वास : आयोजक 
यात्रेचे आयोजक म्हणाले, ही यात्रा ५० पेक्षा जास्त वर्षांपासून सुरू आहे. यात्रेवर महिलांचा विश्वास इतका आहे ही त्या लाखो रुपयांचे दागिने घालून बिनधास्तपणे येतात. यामुळे हा विश्वास टिकवून ठेवण्याचे आव्हान होते. 

बातम्या आणखी आहेत...