आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्झिट पाेल : सत्ताधाऱ्यांना आनंद, विराेधकांना अविश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पाेलमध्ये ‘एनडीए’च बहुमताने सत्तेवर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ते एेकून सत्ताधारी भाजप- शिवसेनेच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असल्या तरी यापेक्षाही जास्त जागा आपल्याला मिळू शकतील, असा त्यांचा दावा आहे. तर विराेधी पक्ष काँग्रेसला हे एक्झिट पाेल अजिबात मान्य नाहीत.

 

‘देशात पुन्हा माेदींचेच सरकार येणार यात शंका नसून यात एकट्या भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळू शकतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे, तर ‘केंद्रात एनडीएची सत्ता येणार नाहीच,’ असा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.


अशोक चव्हाण म्हणाले, ‘केंद्रात एनडीएची सत्ता तर येणार नाहीच, राज्यातही आघाडीला चांगले यश मिळेल. राज्यात आघाडीला २४ ते २५ जागा मिळतील. २३ तारखेला मतमोजणी असून त्याच दिवशी वस्तुस्थिती स्पष्ट होईल. एक्झिट पोल म्हणजे केवळ एक अंदाज आहे आणि खरी स्थिती मतमोजणीनंतर स्पष्ट होईल आणि केंद्रात परिवर्तन होण्याची शक्यता आहे.’

 

भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यात युतीला ४२ जागा मिळतील, असा दावा केला. ‘महाराष्ट्रात युतीच्या ४१ जागाही होणार नाहीत, तर ४२ च्या वरच जागा मिळतील. तसेच देशातही भाजप ३०० जागांचा आकडा पार करून पुन्हा बहुमत मिळवेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘सर्वच एक्झिट पोल १०० टक्के खरे असतात असे नाही, परंतु काही प्रमाणात खरे असतातही. उत्तर प्रदेशमध्ये सपा- बसप आघाडीला ५६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. परंतु त्यात तथ्य नसून त्यापेक्षा जास्त जागा भाजपला मिळू शकतात. काँग्रेस मतांच्या विभागणीमुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचाच फायदा होणार आहे. मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील, असा मला विश्वास आहे.’

 

वंचित, राज ठाकरे फॅक्टरचा परिणाम नाही : मुनगंटीवार
शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘एनडीएला चांगले यश मिळणार असल्याचा अंदाज दाखवले याचा आनंद आहे. जनतेचा जाे निर्णय असेल तो आम्हाला संपूर्णपणाने नम्रतापूर्वक मान्य असेल. जनतेने जी जबाबदारी टाकली आहे ती स्वीकारण्याची मानसिकता ठेवून स्वीकारू.’ भाजप नेते तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे फॅक्टरचा कुठलाही परिणाम होणार नसून युतीला जोरदार यश मिळेल यात शंका नाही.’

बातम्या आणखी आहेत...