आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीचा प्रत्यय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी तिसरीत असतानाचा प्रसंग. बेळगावला असताना गणेशोत्सव पाहण्यासाठी आम्ही सगळी भावंडं आई-वडिलांसोबत बाहेर पडलो. त्या काळातही गणेशाच्या मंडपाची आरास, विद्युत रोषणाई, विविध देखावे पाहून आम्हाला आनंद वाटत होता. एका गणेश मंडळाने कृत्रिम पाऊस- आई-वडील म्हणजे शंकर-पार्वतीस बालगणेशाने घातलेल्या 3 प्रदक्षिणा तसेच पार्वतीने बालगणेशास जिलेबी खाऊ घातल्याचा देखावा अजूनही कायम स्मरणात राहिला आहे. अत्यंत मेहनत घेऊन गणेश मंडळांनी या विविध देखाव्यांचे सादरीकरण केलेले होते.

जवळपास तीन सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहून झाले असतील, मी माझ्या मोठ्या बहिणीचा हात धरून चालत चालत देखावेही पाहत होते. मंडळाचे विविध देखावे पाहण्यात इतके मग्न झाले की, आम्ही दोघी कधी आणि केव्हा विभक्त झालो ते कळलेच नाही. भानावर आले तेव्हा माझ्या लक्षात आले की, मी एका अनोळखीच बाईचा हात हातात धरून चालत होते. मला माझे आई-वडील, भाऊ-बहिणी कोणीच दिसेनात. मी सैरभैर होऊ न धावत सुटले! सगळीकडे शोधत होते, तेव्हा फक्त माणसांची गर्दीच दिसू लागली. माझ्या घरच्या माणसांचे दिसणे दुरापास्त झाले. मी पुन्हा फेरफटका मारू लागले. तितक्यात एका पोलिसकाकाच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी माझी आस्थेने चौकशी केली. नंतर आम्ही दोघांनी मिळून आई-वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला; पण कोणीच सापडले नाही. मग त्यांनी माझा पत्ता विचारला. मला एका सिटी बसमध्ये बसवून ड्रायव्हर आणि कंडक्टरांना सूचना दिली. दुस-या एका सहप्रवाशाच्या मदतीने मी सुखरूप घरी पोहोचले. तोपर्यंत रात्रीचा एक वाजला होता. आमच्या घरमालकांनी मला जेवू घातले. दुस-या दिवशी पहाटेच्या सुमारास माझे आई-बाबा घरी आले. तेही रात्रभर माझा शोध घेत होते. मला त्या घटनेची आठवण प्रत्येक गणेशोत्सवात येते. गर्दीत मुले हरवू नयेत म्हणून योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.