आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मी मूळचा बारामती इथला. 1967 मध्ये मी 16 वर्षांचा होतो. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शिकत होतो. आमचा सात मित्रांचा कंपू होता. हिंडणे, फिरणे, अभ्यास असे आम्ही एकत्रच करत असू. बारामतीपासून 35 किमी अंतरावर नीरा रोड येथे सोमयाचे करंजे हे जागृत देवस्थान आहे. श्रावण महिन्यात तेथे मोठी गर्दी असते. आम्ही सर्व मित्रांनी तेथे सायकलने जाण्याचे ठरवले. मी सोडून सर्वांनी उपवासाचे पदार्थ घरून आणले होते. शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने बरीच गर्दी होती. आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो.
रांगेत दुतर्फा उपवास खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. माझा एक मित्र सुरेश काळे याने दोन आण्याची सहा केळी घेतली आणि वर आणखी एक केळे आजीबाईंकडून मागून घेतले. तेथे माझ्या खोडसाळ स्वभावाने उचल खाल्ली आणि गर्दीचा फायदा घेऊन मी आजीची नजर चुकवून चार डझन केळ्यांचा घड अक्षरश: चोरला. देवदर्शन झाल्यानंतर आम्ही झाडाखाली उपवास सोडण्यासाठी बसलो. माझा मित्र काळे याने प्रत्येकाला एकेक केळ दिले. त्यापाठोपाठ मीही माझी चोरलेली केळी सर्वांना वाटून टाकली. थोड्याच वेळात माझा तोतयेपणा उघडकीस आला. काळे याने दिलेली सर्व केळी चांगली होती, मी वाटलेली चोरीची सर्व केळी अक्षरश: काळीठिक्कर निघाली. मला त्याच वेळी ईश्वराच्या साक्षात्काराची प्रचिती आली. अनेक तीर्थयात्रा करून देव पावत नाही, पण मला मात्र चोरी करून देव पावला. या जागृत देवस्थानावर ‘सतीचं वाण’ हा चित्रपटही निघाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.