Maharashtra News / धारूर येथील सौरऊर्जा प्रकल्पात भीषण स्फोट, एका अभियंताचा मृत्यू तर दोघे जण जखमी

कंट्रोल रुममध्ये झाला होता बिघाड, बिघाड दुरुस्त करत असताना घडला अपघात  
 

दिव्य मराठी

Jul 26,2019 04:52:47 PM IST

धारूर - तालुक्यातील चाटगाव येथील एका सौरऊर्जा प्रकल्पातील कंट्रोल रूममधील बॉक्समध्ये झालेला बिघाड दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. यात एका अभियंत्याचा मृत्यू तर दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे सव्वादोन वाजताच्या सुमारास घडला. जखमींना स्वराती रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे.

धारूर तालुक्यातील चाटगाव येथे ‘तुल्ले तुलाई सोलार प्रोजेक्ट’ नावाचा चारशे एकर क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्प आहे. शुक्रवारी पहाटे या प्रकल्पातील कंट्रोल रूममधील आठ नंबरच्या बॉक्समध्ये अचानक बिघाड झाला होता. झालेला बिघाड दुरुस्त करण्यात येत असतांना यात मोठा स्फोट होऊन जाळ झाला. या वेळी अभियंता जयराज जया बालन (वय २७, तामिळनाडू) यांचा मृत्यू तर रामानंद रामरतन खारवाल (वय २३), संपत कमलाकर शिंदे (वय २३, रा. सिरसाळा) हे दोघे कामगार गंभीर जखमी झाले. या भीषण स्फोटात जयराज बालन १०० टक्के तर इतर दोघे ५० टक्के भाजले गंभीर भाजले होते. त्यांना तातडीने माजलगाव येथे नेण्यात आले. परंतु तेथे दाखल करून न घेतल्याने अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान जयराज बालन याचा मृत्यू झाला. तर, शिंदे आणि खारवाल यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे.


दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही. या ठिकाणी दिवसभर तहसिलदार प्रशासन, विद्युत वितरण कंपनी, पोलीस अधिकारी यांनी भेटी दिल्या. या ठिकाणी पत्रकारांना जाण्यास सेक्युरेटीने मज्जाव केल्याने नेमकी घटना कशी घडली याची माहिती समजू शकली नाही. सोलार प्रमुखाचे प्रमुख याठिकाणी उपस्थित नव्हते.

X