आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पावत्यांद्वारे कोट्यवधींचे जीएसटी क्रेडिट मिळवण्याचा गोरखधंदा उघडकीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : बनावट पावत्या तयार करून कोट्यवधी रुपयांचे जीएसटी क्रेडिट घेणाऱ्या कंपन्यांविरुद्ध जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या नागपूर झोनल युनिटने धडक मोहीम राबवून तब्बल ८२५ कोटी रुपयांचे बनावट व्यवहार उघडकीस आणले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यभरात ५८ कंपन्यांच्या ७५ ठिकाणांच्या झडत्या घेऊन ही कारवाई करण्यात आली. यात मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिकसह इतर शहरांमधील कंपन्यांचा समावेश आहे.

बनावट पावत्या तयार करून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार दाखवायचे व त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्याच्या या गोरखधंद्याविरुद्ध जीएसटी इंटेलिजन्सच्या नागपूर युनिटने मागील तीन महिन्यांपासून आघाडी उघडली आहे. या कारवाईत आतापर्यंत तब्बल ८२५ कोटी रुपयांचे बनावट व्यवहार उघडकीस आणण्यात जीएसटी इंजेलिजन्सला यश आले असून यातून जवळपास १४८ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यात आल्याचे उघडकीस आले. जवळपास दहा हजार बनावट पावत्यांच्या माध्यमातून हे बनावट व्यवहार उघडकीस आणले गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी अधिकाऱ्यांनी ७५ ठिकाणांवर छापे घालून झडत्या घेतल्या. टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी जीएसटीच्या ई-वे बिल पोर्टलवर टाकण्यात आलेले हजारो व्यवहार प्रत्यक्ष उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे तपासण्यात आले. त्या वेळी कंपन्यांनी न विकलेल्या मालावर जीएसटी क्रेडिट मिळवण्याचे प्रयत्न केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले. या व्यवहारांमध्ये मालाच्या वाहतुकीसाठी नमूद करण्यात आलेल्या अनेक वाहनांचे क्रमांकच अस्तित्वात नसल्याचे लक्षात आले, तर काही क्रमांक दुचाकी वाहनांचे निघाले. बनावट कंपन्यांच्या नावांवरही व्यवहार झाल्याचे जीएसटी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईत आतापर्यंत चार जणांना अटकही करण्यात आली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...