आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्प उत्पन्न देणाऱ्या स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांंचे थांबे रद्द होणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकांत सराफ 

भुसावळ : भारतीय रेल्वेने ठरवून दिलेल्या मानकानुसार रेल्वेस्थानकावर निर्धारित उत्पन्न मिळत नसेल तर त्या स्थानकावरील मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे बंद केले जाणार आहेत. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून देशभरातील विविध विभागांतील रेल्वे स्थानकांच्या उत्पन्नाचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षणाचा अहवाल सोमवारी (दि. ६) रेल्वे बोर्डाकडे सादर केला जाणार आहे. यामुळे अत्यल्प उत्पन्न असलेल्या विविध रेल्वेस्थानकांवरील गाड्यांचे थांबे रद्द होण्याचे संकेत आहेत.

रेल्वे मंत्रालयाकडून देशभरातील रेल्वे स्थानकांवर गाड्यांच्या उत्पन्नाची मानके निश्चित करण्यात आली आहेत. मात्र, अत्यल्प उत्पन्न देणाऱ्या रेल्वे स्थानकांवर थांबा दिल्यामुळे, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा वेळ वाया जातो. रेल्वे प्रशासनाच्या पाहणीत ही बाब समाेर अाली आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून भारतीय रेल्वेतील सर्व विभागांतील रेल्वे स्थानकांच्या उत्पन्नाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. गेल्या अाठवड्यापासून रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून हे सर्वेक्षण केले जात आहे. प्रत्येक विभागनिहाय केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल, साेमवारी (दि. ६) रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार आहे. यामुळे ज्या रेल्वे स्थानकावरील उत्पन्न निर्धारित आकडेवारीपेक्षा कमी असेल, अशा स्थानकांवरील सुपरफास्ट, एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचे थांबे रद्द करण्याचे संकेत या सर्वेक्षणातून मिळत आहेत. भुसावळ विभागातील विविध रेल्वेस्थानकांवर थांबणाऱ्या गाड्या, त्यांना मिळणारे प्रवासी, त्यातून रेल्वेला मिळणारे उत्पन्न या बाबींचे सर्वेक्षण केले जात आहे. नाशिक ते भुसावळ, बडनेरा ते भुसावळ आणि खंडवा ते भुसावळ या तीन सेक्शनमध्ये विभागल्या गेलेल्या भुसावळ विभागात १२२ रेल्वे स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. विशेषकरून विभागातील 'अ' वर्ग श्रेणीच्या रेल्वेस्थानकांवर अधिक लक्ष देण्यात आले. यामुळे रेल्वे मंत्रालयाला अहवाल सादर केल्यानंतर कोणत्या स्थानकांवर कोणत्या गाड्यांचा थांबा रद्द केला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

प्रत्येक गाडीचा तपासला डेटा

भुसावळ विभागातील विविध रेल्वेस्थानकांवर थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या उत्पन्नाचा डेटा रेल्वे प्रशासनाने काढला आहे. कोणत्या रेल्वेस्थानकावर किती उत्पन्न मिळते, किती रेल्वे तिकिटे अारक्षित हाेतात, याची सविस्तर माहिती काढण्यात अाली अाहे. ५०० किमीपेक्षा अधिक अंतराची किती आणि त्यापेक्षा कमी अंतराच्या तिकीट विक्रीची माहिती काढण्यात आली आहे. सोमवारी (दि. ६ जानेवारी) यासंदर्भातील अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार आहे.

रेल्वेस्थानकांचे निकष असे

प्रत्येक रेल्वेस्थानकावर थांबणाऱ्या सुपरफास्ट, एक्स्प्रेस, मेल प्रवासी गाडीतून त्या स्थानकाला किमान ६ ते १२ हजार रुपयांचे उत्पन्न त्या गाडीच्या तिकीट 
विक्रीतून रेल्वेला मिळणे अपेक्षित आहे. यापेक्षा कमी उत्पन्न मिळत असल्यास त्या गाडीचा त्या स्थानकावरील थांबा बंद करण्याचा निकष आहे.

चारच स्थानके नियमानुसार

रेल्वेच्या मानकांत भुसावळ विभागातील केवळ चारच स्थानके बसतात. त्यात नाशिक राेड, खंडवा, अकाेला व जळगाव यांचा समावेश होताे. भुसावळही काही गाड्यांच्या नियमात बसत नाही. त्यामुळे आगामी काळात काही स्थानकांवर थांबणाऱ्या गाड्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

बाेर्डाच्या सूचनांकडे लक्ष

रेल्वे बाेर्डाला स्थानकांच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केल्यावर बाेर्डाकडून काय सूचना येतात, याकडे लक्ष लागले आहे. भुसावळ विभागातील कुठला थांबा रद्द होतो याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्येही उत्सुकता आहे. रेल्वे प्रशासनाकडून नाॅन अर्निंग स्टाॅपेजवर अाता बारकाईने लक्ष िदले जात अाहे.
 

बातम्या आणखी आहेत...