आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे सरकारचा विस्तार; आज 36 मंत्र्यांना शपथ, मंत्रिमंडळात स्थान नसल्याने आघाडीतील घटक पक्षांची नाराजी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल एक महिन्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लाभला आहे. साेमवारी शिवसेना १३, राष्ट्रवादी १३ आणि काँग्रेसच्या १० मंत्र्यांना राज्यपाल पद व गोपनीयतेची शपथ देतील. विधानभवनाच्या प्रांगणात दुपारी एक वाजता हा कार्यक्रम हाेणार असून त्याच्या तयारीसाठी रविवारी दिवसभर राजशिष्टाचार विभागाकडून लगबग सुरू होती.

मंत्रिपदी कोणाची वर्णी लावायची याबाबत खल करण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे रविवारी सायंकाळपर्यंत तिन्ही पक्षांच्या बैठका सुरूच हाेत्या. शिवसेनेचे १० कॅबिनेट व ३ राज्यमंत्री, राष्ट्रवादीचे १० कॅबिनेट व ३ राज्यमंत्री आणि काँग्रेसचे ८ कॅबिनेट व २ राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांनुसार मंत्रिपद वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आलेले होते. काँग्रेसचे दाेन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशाेक चव्हाण यापैकी काेणाची मंत्रिमंडळात वर्णी लागते याविषयी पक्षात उत्सुकता हाेती. मात्र रविवारी दिल्लीतील बैठकीत अशाेक चव्हाण उपस्थित हाेते. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे. विस्तारानंतर ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आता ४२ मंत्री असतील.

महाविकास आघाडीचे संभाव्य मंत्रिमंडळ

शिवसेना : अनिल परब, प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर किंवा सुनील प्रभू, सुनील राऊत, उदय सामंत, भास्कर जाधव किंवा वैभव नाईक, आशिष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड, गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर, तानाजी सावंत, संजय शिरसाट किंवा अब्दुल सत्तार.

काँग्रेस : अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, संग्राम थोपटे, वर्षा गायकवाड, अमीन पटेल, विजय वडेट्टीवार, यशाेमती ठाकूर, के. सी. पाडवी.

राष्ट्रवादी काँग्रेस : अजित पवार, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अदिती तटकरे.

पुन्हा उपमुख्यमंत्रिपदासह दादांकडे गृह खातेही?

राष्ट्रवादी पक्षातून फुटून भाजपबरोबर सत्ता स्थापन केलेले राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाकरेंच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. त्यांच्याकडे पुन्हा उपमुख्यमंत्रिपद देण्याबराेबरच गृह खात्याची जबाबदारीही दिली जाऊ शकते.

बच्चू कडूंची लाॅटरी : शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीपल रिपब्लिक पार्टी, प्रहार संघटना या छोट्या पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसाेबत निवडणुका लढवल्या होत्या. परंतु यापैकी बच्चू कडू वगळता एकाही घटक पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची चिन्हे नाहीत.

 

बातम्या आणखी आहेत...