आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडून पाहणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ- "सततच्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, कांदे, मका आदी पिकांत पाणी जास्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदरच्या नुकसानीबाबत पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील आहे", असे आश्वासन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांना दिले.


मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे डाळींब, कांदा, मका, टोमॅटो व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
त्याची पाहणी करण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख आले होते. जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, तहसीलदार जीवन बनसोडे, मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष सतिश काळे, नगरसेवक सुशील क्षीरसागर, कृषी अधिकारी एस.बी.मोरे, रामदास झेंडगे, सागर लेंगरे, गणेश भोसले, मदन लाळे, पुष्पा शेंडगे, सचिन आसबे, अनिल पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते. 
भास्कर ताकमोगे, हरिदास चेंडगे या शेतकऱ्यांची टोमॅटो, द्राक्ष, मका, कांदा, डाळिंब आदी पिकांची सहकारमंत्री देशमुख यांनी पाहणी करत नुकसानीची माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांवर पडण्यात येणारे रोग, पिकांची झालेली नासाडी, आळीचा प्रादुर्भाव आदी समस्या मांडल्या. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी यायला उशीर झाला तर शेतकऱ्यांनी स्वतः नुकसानग्रस्त पिकांचे फोटो काढून तहसिलदारांना दिले तरी विमा असो अथवा नसो ते ग्राह्य धरण्यात येतील. याबाबतच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री उपसमितीच्या बैठकीत निर्णय होऊन निश्चित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होईल. असे सुभाष देशमुखांनी सांगितले.

सततच्या पावसामुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागांना खते व फवारणीचा खर्च केला मात्र पावसाने सगळे धुऊन गेलं. कांदा नासला, मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला, बागांमध्ये फळे जरी आली तरी ती कमकुवत निघणार आहेत. त्यातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडणार नाही. शासनाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तातडीची मदत द्यावी. -हरिदास शेंडगे, शेतकरी, शिरापूर ता. मोहोळ

बातम्या आणखी आहेत...