आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने दाणादाण, रब्बी पिकांचे मोठे नुकसान; पालकमंत्र्याचे पंचनामे करण्याचे निर्देश

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बीड शहरासह केजमध्येही पावसाच्या हलक्या सरी

बीड- जिल्ह्यात रविवारी दुपारपासूनच बीड, धारूर, परळी, केज, पाटोदा, वडवणी, माजलगावसह अन्य तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटात जोरदार अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतामधील पिकांसह आंब्याचा मोहर गळून मोठे नुकसान झाले. धारूर तालुक्यातील चोरांबा येथे शनिवारी रात्री वीज पडून वैजनाथ मारुती चव्हाण यांच्या शेतातील चाऱ्याची गंजी जळून खाक झाली, तर वडवणी तालुक्यातील डोंगरे वस्ती, चिंचवण येेथे अंगावर वीज पडल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली.

शहरामध्ये रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अवकाळी पावसाला तुरळक सुरुवात झाली. दरम्यान, साडेतीन ते चारच्या दरम्यान २० मिनिटे जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील रविवारी भरणारा आठवडी बाजारात नागरिकांची पळापळ झाली, तर शेतकरी-विक्रेत्यांची मोठी गैरसोय झाली. महात्मा फुले भाजी मंडई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये अवकाळी पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला पाण्यात बुडाला. पावसापासून बचावासाठी काही शेतकरी भाजी विक्रेत्यांनी सारवासारव करण्यासाठी तारांबळ उडाली. शहरातील अनेक ठिकाणी नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी साचले होते.  त्यामुळे त्रेधातिरपीट उडाली.

विजेच्या कडकडाटात ३५ मिनिटे पडला दमदार पाऊस  


सिरसाळा - वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाला रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास सिरसाळ्यासह परिसरात सुरुवात झाली. जवळपास  ३५ मिनिटे दमदार पाऊस झाला. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना गेल्या दोन-तीन दिवसांपासून पहाटेच्या वेळेला गारठा जाणवत आहे. तर दिवसा उकाड्यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आकाशात ढग जमले आणि वादळी वारा सुरू झाला. यात आंब्याचा मोहर गळाला असून गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांवर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांच्या काळजीत वाढ झाली. वीट उत्पादकांनाही याचा फटका बसला.  पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वांची त्रेधातिरपीट उडाली. 

धारूर तालुक्यात काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान

धारूर- शहर व परिसरात शनिवारी रात्री व रविवारी दुपारी आणि सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे काढणीस आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, मक्यासह आदी रब्बी पिके भुईसपाट झाले आहेत, तर आंब्यांचा मोहर गळून पडला आहे. शनिवारी रात्री चोरांबा येथे वीज पडून वैजनाथ मारुती चव्हाण यांच्या शेतातील चाऱ्याची गंजी जळून खाक झाली आहे. 

वीज पडून कोळगावच्या  मंदिराच्या शिखराला तड

गेवराई- तालुक्यातील कोळगावसह परिसरात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. या वेळी कोळगाव येथील दत्त मंदिराच्या शिखरावर वीज कोसळली. त्यामुळे शिखराला तडे गेले आहेत. मात्र, यात कुठलीही जिवितहानी झाली नाही, अशी माहिती कोळगाव येथील बबन महाराज लोंढे, जयदत्त बनसोडे यांनी दिली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...