Home | Business | Business Special | facebook data sharing criminal investigation

युजरचा डाटा शेअर करण्याच्या आरोपात फेसबुकच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा

वृत्तसंस्था | Update - Mar 15, 2019, 11:19 AM IST

150 कंपन्यांसोबत फेसबुकचा डाटा शेअर करण्यासंबंधी करार, न्यूयॉर्कच्या न्यायालयाने दोन कंपन्यांना पाठवली नोटीस

 • facebook data sharing criminal investigation

  सॅन फ्रान्सिस्को - वेगवेगळ्या कंपन्यांसोबत डाटा शेअर करण्याचा करार केल्याच्या आरोपात फेसबुकच्या विरोधात गुन्हेगारीप्रकरणी तपास हाेण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार स्मार्टफोन आणि इतर डिव्हाइस बनवणाऱ्या कमीत कमी दोन कंपन्यांना न्यूयॉर्कच्या एका न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. यामध्ये फेसबुकच्या करारानुसार मिळालेल्या डाटाचा वापर त्यांनी कशा पद्धतीने केला याबाबतचा खुलासा विचारण्यात आला आहे. फेसबुकने या कंपन्यांना कोट्यवधी युजरचा डाटा दिला होता. या कंपन्यांच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. वृत्तानुसार फेसबुकने अॅमेझॉन, अॅपल, मायक्रोसॉफ्ट, सोनीसारख्या एकूण १५० टेक कंपन्यांसोबत डाटा शेअरिंगचा करार केला होता. डिव्हाइस बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये हुवावे, लेनोवो आणि ओप्पो यासारख्या चिनी कंपन्यांचाही यात समावेश आहे.


  डिसेंबरमध्येदेखील न्यूयॉर्क टाइम्समध्ये या प्रकारचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्या वेळी आमचे स्वत:चे अॅप नसल्याचे सांगत फेसबुकने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डाटा शेअर करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. जाहिरातदारांना डाटा शेअर करण्यात आला नसल्याचेही सांगितले होते.


  कोणता डाटा घेतला युजरला माहितीच मिळत नाही
  या करारानुसार लोकांना ब्लॅकबेरी आणि विंडोज मोबाइल फोनसारख्या प्लॅटफॉर्मवर फेसबुक एक्सेल करण्याची सुविधा मिळत होती. बदल्यात प्लॅटफॉर्म प्रदान करणाऱ्या कंपनीला युजरशी संबंधित डाटा मिळत होता. वास्तविक नेमका स्वत:च्यासंबंधी कोणता डाटा जमा करण्यात आला आणि कोणता शेअर करण्यात आला याची माहिती युजरला नसते. यातील अनेक करार आजच्या तारखेला संपलेले आहेत. वृत्ताप्रमाणे या करारांतर्गत या कंपन्यांना युजरची फ्रेंड लिस्ट, काॅन्टॅक्टसंबंधी माहिती आणि इतर डाटा उपलब्ध करून देण्यात आला होता. अनेक वेळा त्यासाठी युजरची सहमती घेण्यात येत नव्हती.


  भारतात संसदीय समितीनेही अधिकाऱ्यांची केली चौकशी
  फेसबुकवर जगभरातील अनेक देशांमध्ये डाटा चाेरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या जाहिराती आणि इतर फेक न्यूजला प्रोत्साहन दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात भारतात आयटी प्रकरणावर तयार करण्यात आलेल्या संसदीय समितीने सहा मार्च रोजी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. समितीने फेसबुकला आगामी लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील पूर्ण माहिती देण्यास सांगितले आहे. त्यासाठी कंपनीला १० दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.


  व्हॉट्सअॅपच्या संस्थापकांचे फेसबुक बंद करण्याचे आवाहन
  व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन एक्शन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आवाहन करत त्यांचे फेसबुक खाते डिलीट करण्यास सांगितले आहे. एका कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी ते विद्यापीठात आले होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाला फेसबुकच्या माजी सॉफ्टवेअर अभियंता एलोरा इसरानी यादेखील उपस्थित होत्या. ब्रायन यांनी सांगितले की, “आपण फेसबुकला स्वत:ची शक्ती देत आहोत. आपण त्यांची उत्पादने खरेदी करतो. त्यांच्या सल्ल्यानुसार वेबसाइटवर साइनअप करतो. हे धोकादायक आहे. तुम्ही फेसबुक डिलीट करायला हवे.’ ब्रायन यांनी जॅन कोम यांच्यासोबत मिळून व्हॉट्सअॅप सुरू केले होते. त्यांनी २०१४ मध्ये २,२०० कोटी डॉलर (सुमारे १.५ लाख कोटी रुपये) मध्ये हे फेसबुकला विक्री केले होते.

Trending