आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक लाइव्ह, 5 व्या मजल्यावर चढून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- फेसबुक लाइव्ह करत एका अल्पवयीन विद्यार्थिनीने मी आत्महत्या करणार आहे, त्याला तुम्ही कळवा', असे जोरजोराने ओरडत निर्माणाधीन इमारतीच्या पाचव्या मजल्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. अनेकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आत्महत्येच्या भूमिकेवर अडून बसली. शेवटी ती शिकत असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक आणि मैत्रिणींना बोलावून तिची समजूत काढण्यात पोलिसांना यश आले. मात्र तब्बल दोन तास हे नाट्य चालल्याने पोलिसांची झोप उडाली होती. चारच दिवसांपूर्वी एका तरुणीने फेसबुक लाइव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच दुसरी घटना घडल्याने पालकांत आपल्या पाल्यांविषयी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 

लातूरमधील शिवाजी चौकात जिल्हा क्रीडा संकुलाच्या समोरील बाजूस एका इमारतीचे काम सुरू आहे. जागा मालकाने तेथे एक सुरक्षा रक्षकही नेमला आहे. गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्याला कोणीतरी घाईगडबडीने इमारतीत शिरल्याचे दिसले. सुरक्षा रक्षकाने आवाज देऊन रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फायदा झाला नाही. तेवढ्यात रस्त्यावरून जाणाऱ्या एक-दोघांना काम सुरू असलेल्या या इमारतीच्या वर एका मुलीचा आवाज ऐकू आला. ती मुलगी आपण उडी मारणार असल्याचे सांगत होती. हळूहळू तेथे गर्दी जमत गेली. त्यातील एकाने शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांची एक गाडी लगेचच हजर झाली. तोपर्यंत पोलिसांनी अग्निशमन दलाला याची कल्पना देऊन त्यांनाही तेथे बोलावून घेतले. नियंत्रण कक्षालाही याची माहिती देण्यात आली. एकीकडे बघ्यांची गर्दी वाढत असतानाच मुलीच्या आत्महत्येची धमकीही वाढत होती. त्यामुळे सगळेच काजीत पडले होते.
 
पोलिसांनी जबाब नोंदवला : 
पोलिसांनी त्या विद्यार्थिनीला ठाण्यात नेऊन तिची विचारपूस केली. तिचा जबाब नोंदवण्यात आला. या प्रकाराची माहिती मुलीच्या पालकांना देऊन त्यांना लातूरला बोलावण्यात आले. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी तिचा रीतसर जबाब नोंदवून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. हा प्रकार प्रेमभंग झाल्याने केल्याचे तिचे म्हणणे होते. 

 

पोलिसांचे समुपदेशन : 
शिक्षणासाठी आलेल्या मुला-मुलींनी या वयात केवळ शिक्षणावरच लक्ष केंद्रित करावे, असे समुपदेशन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, चारच दिवसांपूर्वी म्हणजे सोमवारी दिवसांपूर्वीच एका तरुणीने अंतर्गत वादातून फेसबुकवरून लाइव्ह करीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

 

प्रेमप्रकरणातून आत्महत्येची धमकी : पोलिसांनी बोलण्यात गुंतवून विद्यार्थिनीचा जीव वाचवला 
विद्यार्थिनी आत्महत्येवर ठाम दिसत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी खालच्या बाजूला जाळी किंवा कापड पकडता येईल काय याची चाचपणी सुरू केली. शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब लाकाळ, नंतर उपाधीक्षक संदीप सांगळे यांनीही हजेरी लावली. तरीही गुंता सुटत नव्हता. ती मुलगी अहमदनगर जिल्ह्यातील असून लातूरमध्ये शिक्षणासाठी एका खासगी वसतिगृहात राहत असल्याचे तिच्या बोलण्यातून स्पष्ट झाले होते. मी आत्महत्या करणारच, त्याला तुम्ही कळवा, असे ती ओरडून सांगत होती. तिला पोलिसांनी बोलण्यात गुंतवून ठेवत सांगळे आणि इतर पोलिस जवान इमारतीवर चढले. तिच्या मैत्रिणीच्या आणि शिक्षकांनाही पाचारण करून त्यांच्या माध्यमातून तिच्याशी संवाद साधत समजूत काढली. अखेर रात्री अकरा वाजत उपधीक्षक सांगळे आणि एका पोलिस जवानाने तिला अलगद पकडून सुखरूप खाली आणले. 

बातम्या आणखी आहेत...