अंतराळातही गुरुत्वाकर्षण शक्ती / अंतराळातही गुरुत्वाकर्षण शक्ती असते का? जाणून घ्या, वास्तव

अंतराळात गुरुत्वाकर्षण शक्ती नसते, त्यामुळे तेथे सर्व गोष्टी तरंगतात, असे म्हटले जाते. येथे जाणून घ्या, यामागचे सत्य...

Feb 06,2019 12:26:00 PM IST

अंतराळात गुरुत्वाकर्षण शक्ती नसते, त्यामुळे तेथे सर्व गोष्टी तरंगतात, असे म्हटले जाते. पण हे पूर्ण सत्य नाही. अंतराळात प्रत्येक ग्रहाला स्वत:ची गुरुत्वाकर्षण शक्ती असते. त्यामुळेच चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, अन्यथा तो पृथ्वीच्या कक्षेबाहेर भरकटला असता.


नासा या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेच्या मते, बहुतांश लोकांमध्ये हा समज असतो की, अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते. पण अंतराळात प्रत्येक ठिकाणी ही शक्ती असते. अर्थात जी जागा रिक्त असते, त्या ठिकाणी सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असते. त्याला मायक्रो ग्रॅव्हिटी असे म्हणतात. अंतराळातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वत:कडे आकर्षित करते. या दोन वस्तूंमध्ये किती द्रव्य आहे आणि त्या किती अंतरावर आहेत, यावर हे आकर्षण अवलंबून असते.


ब्रह्मांडात वस्तू किंवा ग्रहांमधील अंतर वाढल्यास गुरुत्वाकर्षण कमी होत जाते. गुरुत्वाकर्षणच ग्रहांची कक्षा, सौर मंडळ, आकाशगंगांना आकार देते. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण, चंद्र आणि मानवनिर्मित उपग्रहांना कक्षेतच ठेवते. अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण अंतराळ प्रवाशांना तितके जाणवत नाही. क्षीण गुरुत्वाकर्षणामुळे व्यक्ती, वस्तू हलक्या जाणवतात. त्यामुळे तेथे तरंगत असल्याचा भास होतो. वेगाने चालणाऱ्या लिफ्टमध्ये किंवा रोलर कोस्टरमधून डोंगरावरून खाली येताना आपल्याला हलके झाल्याचे जाणवते.

X