आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांना बरोबर घेऊन फडणवीसांचा जोखमीचा डाव!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तेच्या खुर्चीच्या खेळात कोणता पक्ष जिंकेल, याचा अंदाज वर्तवणे कठीण झाले आहे. ज्या भाजपने ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळा झाल्याचे भांडवल केले, अजित पवारांना 'अलिबाबा - चाळीस चोर'सारखी दूषणे देऊन २०१४ मध्ये सत्ता मिळवली, त्याच भाजपने अाता अजित पवारांना बरोबर घेऊन सत्तास्थापनेचा खेळ केला. इतकेच नव्हे तर अाधी ज्यांना तुरुंगात धाडण्याची भाषा केली त्याच अजितदादांना अाता उपमुख्यमंत्री केले. यातून भाजपने केवळ सत्तेसाठी जाेखमीचा डाव खेळला असून त्याचे दुरगामी परिणाम पक्षावर हाेऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे संकटात असलेले शेतकरी आणि नागरिकांच्या हितासाठी राज्यात लवकरात लवकर सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे. परंतु, सत्तास्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या चाली चालत आहेत, ही खटकणारी गोष्ट आहे. अजित पवारांवर पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत सर्वांनीच तिखट टीका केलेली आहे. २०१४ मध्ये तर फडणवीसांनी राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नसल्याचे छातीठोक सांगितले हाेते, परंतु त्यांनी २३ नोव्हेंबरला त्यांनी अजित पवारांना बरोबर घेऊन 'गुपचूप' मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

राजकारणात सर्वकाही चालते...

सत्तेसाठी अजित पवारांशी हातमिळवणी करण्यामुळे भाजपच्या प्रतिमेवर किती विपरीत परिणाम झाला, याचे उत्तर भविष्यात मिळेलच; परंतु फडणवीसांच्या स्वच्छ प्रतिमेला तडा गेला. २०१४ मध्ये मुख्यमंत्री होताच फडणवीसांनी 'राजकारणात सर्वकाही चालते' हे सूत्र स्वीकारले. मुंबई बँक घोटाळ्यातील प्रवीण दरेकरांना मनसेतून फोडून पक्षात आणले आणि विधान परिषद सदस्य केले. एकेकाळी भाजपच्या घोटाळेबाजांच्या यादीत असलेले बबनराव पाचपुतेही आता भाजपचे आमदार आहेत. तर पूर्वीचे अजितदादांचे निकटवर्तीय जाणारे प्रसाद लाडही भाजपमध्ये असून फडणवीसांच्या कोअर टीममध्ये आहेत.

देवेंद्र फडणवीस, अजितदादांचा फायदा-ताेटा...

राज्यात स्वार्थाचे राजकारण सुरू आहे. अशात फडणवीसांनी अजित पवारांना बरोबर घेऊन पक्षाचा तात्कालिक फायदा करून घेतला असला तरी स्वत:चे दीर्घकालीन नुकसान करून घेतले अाहे.

भाजपसाेबत जाण्याचा निर्णयाने अजित पवारांचा फायदा आणि नुकसान दोन्हीही आहे. पहिला फायदा म्हणजे सिंचन आणि सहकारी बँक कर्जवाटप घोटाळ्यात अभय मिळू शकते.

अजित पवारांचे माेठे नुकसान म्हणजे शरद पवारांचे संरक्षक छत्र दूर होईल. सत्तेतून बाहेर झाल्यावर त्यांना या नुकसानीची तीव्रता जाणवेल.


फडणवीस सरकारने अजित पवारांच्या बळावर विश्वासदर्शक ठराव जिंकला तरच सत्ता राखणे भाजपला शक्य हाेईल, मात्र सरकार काेसळले तर फडणवीस ताेंडघशी पडू शकतात.

निवडणुकीतील भाषणांत अजित पवारांना कारागृहात पाठवण्याची भाषा करणारी भाजप आणि फडणवीस आता त्यांच्या समर्थनात उभे राहतील.