फैजाबादचे नाव आता / फैजाबादचे नाव आता अयोध्या, विमानतळाला देणार प्रभू श्रीरामांचे नाव

वृत्तसंस्था

Nov 07,2018 06:55:00 AM IST

अयोध्या - उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्याचे नाव आता अधिकृतपणे अयोध्या होणार आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मंगळवारी शरयू नदीच्या तीरावर रामकथा पार्कमध्ये आयोजित दीपोत्सवात ही घोषणा केली. या दीपोत्सवात तीन लाख दिवे लावण्यात आले. या भव्य कार्यक्रमाला दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांच्या पत्नी किम जंग सूक यांची उपस्थिती होती.


अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या मेडिकल कॉलेजचे नाव राजा दशरथ असेल, अशी घोषणाही योगी यांनी केली. याशिवाय अयोध्येत विमानतळ बांधण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या विमानतळाला प्रभू श्रीरामांचे नाव देण्यात येईल. अयोध्यानगरी हे भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. श्रीरामांचे हे शहर त्यांच्याच नावाने ओळखले गेले पाहिजे, असे योगी म्हणाले. यापूर्वी राज्य सरकारने अलाहाबादचे नाव प्रयागराज केले होते. तर, लखनऊचे नाव लक्ष्मणपूर करण्याची मागणीही होत आहे.दरम्यान, तीन लाख दिवे पेटवून नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. गिनीज बुकात याची नोंद झाली आहे.

द. कोरियाचे प्राचीन नाते
दक्षिण कोरियाचे लोक येथे आपले भूतकाळातील नाते जोडण्यासाठी आले असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. या देशातील प्रतिष्ठित लोकांच्या आगमनामुळे रामकथेला आता जागतिक ओळख मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजकुमारी सुरिरत्नाचे स्मारक
अयोध्येच्या राजकुमारी सुरिरत्ना यांच्या स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण सूक यांच्या हस्ते करण्यात आले. सुरिरत्ना यांचा विवाह दक्षिण कोरियाच्या राजाशी झाला होता. सूक या वेळी म्हणाल्या, भारत-दक्षिण कोरियाचे दोन हजार वर्षांपूर्वीचे नाते आज पुन्हा दृढ झाले आहे.

X
COMMENT