आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त सैल झालाय दोर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात राहून स्वत:ची स्वतंत्र कविता जगणारी कवयित्री म्हणजे पद्मरेखा धनकर. त्यांचा ‘शलाका’ नंतरचा ‘फक्त सैल झालाय दोर’ हा दुसरा कवितासंग्रह ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांनी अलीकडेच प्रसिद्ध केला आहे.  आदिम काळापासून विश्व उभारणीमध्ये स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने, नव्हे तर अधिक योगदान राहिलेले आहे. अगदी नांगर-शेती-अंतराळातील संशोधनामध्ये स्त्रिया नेहमीच अग्रस्थानी राहिलेल्या आहेत. असे असूनही त्यांना एका विशिष्ट चौकटीत, कोंदणात ठेवले. त्यांच्याकडे असलेली निसर्गदत्त सृजनक्षमता हे यामागील कारण. स्त्रियांबरोबरच त्यांच्या कलांनादेखील गौण लेखले. त्यांना बंधयुक्त जीवन जगण्यास भाग पाडले. हे सर्व ‘स्व’ आणि ‘पर’ अशा आपपर भावातून झाल्यामुळे पुरुषी ‘स्व’ला श्रेष्ठ ठरवण्यासाठी स्त्रीला प्रेमळ, भावूक, नाजूक ठरवून समाजजीवनात तिची एक ‘आदर्श प्रतिमा’ तयार केली. या प्रतिमेसह असंख्य शृंखलांनी तिला जखडून ठेवले गेले. त्या ध्वस्त करण्याचा अनेक विचारवंत, लेखिका व कवयित्रींनी प्रयत्न केला, अजूनही होत आहे. पण या ‘शृंखला तुटल्याच नाहीत कधी, तर फक्त सैल झालाय दोर’ असे म्हणत पद्मरेखा धनकर ही कवयित्री प्रचंड क्षमतेची कविता जगते. ही कविता जैविक भेद, स्त्रीत्व, स्त्रीवाद व स्त्रीत्वाची समाज संरचनांच्या टप्प्यांतून मार्गक्रमण करते. ‘मी नाकारलीय ठरीव सही/अन् सारेच नाकारताहेत मला.../होऊ दे वाट्टेल ते/आता करायचे नाही तेच ते घोटीव/उमटवायची रोज दिगंताच्या भाळी/नव्या शाईच्या सौंदर्याची स्वाक्षरी’ यातून बदलाच्या अपेक्षेसह ती करारी बाण्याने पावलं टाकू पाहते; पण हा कावेबाज समाज तिला तिचं असणं हे ‘त्याच्या’साठी असल्याची जाणीव करून देतो. ती त्याच्यासाठी रितेपणाचं, विरंगुळ्याचं ठिकाण. तो लदबदलेल्या झाडासारखा येऊन रिता होऊन जातो. ती देहमोगरा शिंपणारी. स्पर्शाची लयदार पालवी. तिची आरसपानी त्वचा वगैरे सर्वकाही केवळ त्याच्यासाठी. मात्र तिच्या वाट्याला क्वचितच देहातीत मिलनाचे सुगंधी क्षण येतात, तेव्हा तो दरवळणाऱ्या सुगंधी डब्याच्या तळाला भोक करून जातो. तो भुरभुरणाऱ्या रेतीसारखा मस्तमौला बेपर्वा, बिनधास्त; तर ती कायमच फ्रेममध्ये अडकलेली. ही फ्रेम कधी कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध, प्रथा-परंपरा, समाज वा मुलामुलींची, जी कायमच तिला जखडून ठेवते. त्याने संसार केला काय, नाही केला काय; त्यानं मुलाबाळांडे पाहिलं काय, नाही पाहिलं काय; वा त्यानं तिला सोडलं काय अन् ठेवलं काय त्याला काही फरक पडत नाही. एवढंच नाही, तर तो कोलमडून पडला तरी तिला मोडून पडता येत नाही. तिच्यात नैसर्गिकच चिवट व जीवटपणा असल्याने ती कोलमडतही नाही, पण तसं झालं तर त्याला जय-पराजयाचे संदर्भ प्राप्त होतात. तिच मात्र तसं नसतं...ती त्याच्या मोडून पडण्याने विव्हळते. रुद्ध होते. तो कसाही उधळला तरी चालतं; पण तिच्यातल्या माणूसपणानं थोडं डोकं वर काढलं, स्वत:ला मॉडर्न करण्याचा प्रयत्न केला की अनेक प्रश्न निर्माण होतात. तेव्हा ती म्हणते, ‘माझ्या मंगळसुत्रावरून शोधतात स्त्रीवाद/ माझ्या केसांवरून ठरवतात/ विचारांची लांबी/ माझ्या खळाळून हसण्याने/ त्यांच्या जगात येतोय भूकंप/ माझ्या जिन्स घालण्याने/ ते होतात अस्वस्थ.’ आणि समाजात चव्हाट्यावर, चर्चासत्र, परिषदांमधून स्त्रीवादाच्या गोष्टी, निबंध वाचले जातात. हे मंचापुरतंच असतं.  तिने मांडलेलं स्त्रीचं जगणं हा हास्याचा विषय होतो, तेव्हा तिच्या आत खोलवर स्त्रीत्वाची अनादी जखम होते. असेच अनेक आघात तिच्यावर सनातनी परंपरा, उत्सव व व्रतांमुळे होतात. आजीनं पेरलेली गौर, सांगितलेले उपवास, व्रत आणि चांगला नवरा याचं सूत्र तिला कळत नाही. तेव्हा ती म्हणते, ‘हळूहळू कळत गेलं/व्रताने फुलत नाही संसार/ देहातलं अंतर मिटलं तरी/ मनातलं भगदाड भरत नाही/ हस्तांतरीत होतो फक्त वारसा/ दृष्टिहीन डोळ्यांचा’. अनेक उपास-तापास करून साठा उत्तराची कहाणी कधीच सुफळ संपूर्ण झाली नाही. तेव्हा ती गौर न पेरण्याचा निर्धार तर करतेच, पण मुलीच्या हातीही कधीच परडी न देण्याचा निर्णय घेते. मुळातच समाजाने आखून ठेवलेल्या रेषांमध्ये तिला जगणं मान्य नाही. तो सोडून गेल्यानंतर काही दिवस त्याच्यासाठी आतूर असते, दार उघडं ठेवते; पण पुढे ते दार न उघडण्याचा ठाम निर्णय घेते. जो कृष्ण बासरीच्या मंजुळ स्वरांनी राधेसह असंख्य सख्या अन् साऱ्या गोकुळास मंत्रमुग्ध करायचा असं पुराण सांगतं; पण कवयित्री म्हणते की, कृष्णाच्या बासरीच्या अॅनेस्थेटिक लहरींनी सभोवार निश्चल केला. देह चेतनाहीन केले. मेंदूंवर कब्जा केला. त्यामुळे अनेक आवाजांसह सृष्टी लोप पावून केवळ कृष्णरुपी दृष्टी निर्माण झाली. वास्तवात पारंपरिक मिथकांचं पुनर्वाचन करताना ही दृष्टी आणि हा कृष्ण म्हणजे पुरुषी दृष्टिकोन आणि पुरुषी व्यवस्थेचा प्रतिनिधी असल्याचा निर्वाळा ती देते. ही दृष्टी स्त्रीचं भोगाच्या पलीकडंच स्थान निर्माण होऊ देत नाही. यातूनच उन्मादक देह, योनिशुचिता, लिंगपूजा, स्त्रीचं वर्जीन असणं यासारख्या गोष्टी निपजल्या. सोबतच शरीर बंध, लिंगभेद, स्खलन, वंचना, सेज सजवणं आलं. मधुचंद्र वा समागमांसारख्या सृजक निसर्गधर्मांना पुरुषांनी धसमुसळेपणाचं रूप दिलं. त्यातून त्यांना स्त्रियांवर अधिकार गाजवण्याचं शस्त्र मिळालं; पण मी ‘माझ्यातील मातृत्वाशी कॉम्प्रमाईज करणार नाही’, असा ठाम निर्धार ती व्यक्त करते. स्त्री–पुरुष नातेसंबंधा बरोबरच अनिश्चित वर्तमान, विषारी समाज आणि भयग्रस्त समाज, झुंडीचं राजकारण, जातीयता, धर्मांधता, उन्मादी राष्ट्रवाद, रस्त्यांवरील रंग आणि चौकातील मेणबत्या हा भवताल म्हणजे गर्तेत घेऊन जाणारं ‘कृष्णविवर’च. बीजधारणेपासूनच वंश आणि वर्णप्रेमाचे स्वर रुजवले जातात. सर्वत्र विद्वेषाच्या, विषवृक्षाच्या मुळ्या वाढल्यात. ‘स्वातंत्र्यदेवतेच्या धगधगत्या मशालीखाली काळ्या रक्ताच्या माणसांचा काळाकुट्ट अंधार पसरलाय, राजदंड पायी तुडवून व्याख्यानं दिली जाताहेत, संविधानाच्या पायरीवर निर्लज्ज बुट रोवून भाषणं दिली जाताहेत. संविधानाच्या पानांवर धूळ साचलीय आणि सतत हल्ल्याची, युद्धाची भाषा बोलली जाते. हे सगळं तिला मोडीत काढायचंय. जुनेऱ्यांची दृष्टी बदलाचीय. युद्धखोर, उन्मादी स्थितीत ‘चालले कितीही रणगाडे सीमेवर तरीही फुलपाखरं कधी मरत नसतात’ असा आशावाद ती व्यक्त करते. ही फुलपाखरं म्हणजे नवी पिढी. लेखकाचा संपर्क - ७५८८१६५२२१