आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्याच्या पैशांसाठी बनावट कागदपत्रांसह खोटा दावा, अहवाल सादर करण्याचे एसपींना आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अपघाती मृत्यूच्या प्रकरणात विम्याच्या भरपाईचे पैसे लाटण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे मोटार अपघात प्राधिकरणासमोर खोटा दावा दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांसह कर्जत पोलिसांनी हा प्रताप केला आहे. त्यामुळे न्यायालयाने दावा तर फेटाळून लावलाच. त्यासोबत खोटा दावा करणाऱ्या व्यक्तींसह पोलिसांवरही योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. या कारवाईचा अहवाल दोन महिन्यांच्या आत न्यायालयात सादर करावा लागणार आहे. प्राधिकरणाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी हा आदेश दिला.

 

कर्जत तालुक्यातील बेनवडी - श्रीगोंदे रस्त्यावर मे २०१५ मध्ये किसनराव गुलाबराव देशमुख (वय ६५) या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध वेगाने व हयगयीने वाहन चालवून अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. किसनराव यांचा मुलगा शशिकांत व विधवा पत्नी सुलोचना यांनी काही दिवसांनी मोटार अपघात प्राधिकरणासमोर विम्याची भरपाई मिळावी, यासाठी दावा दाखल केला. दाव्यामध्ये त्यांनी रिलायन्स कंपनीकडून ८ लाखांची नुकसान भरपाई मागितली होती.

 

किसनराव व शशिकांत हे दुचाकी (एमएच १६ एसव्ही ४४५२) वरून श्रीगोंद्याला जात होते. पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने दोघे पडून जखमी झाले. किसनराव यांना दवाखान्यात नेल्यानंतर तेथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. पोलिस तपासात धडक देणारे वाहन (क्र. एमएच १६ बीजे ०९२३) असल्याचे निष्पन्न झाले. हे वाहन शरद देशमुख चालवत होता. ते खंडू गुरुदास देशमुख याच्या मालकीचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या दोघांसह रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या नगरच्या शाखा व्यवस्थापकाला प्रतिवादी केलेले होते.

 

किसनराव हे दूध उत्पादक शेतकरी होते. त्यांचे मासिक उत्पन्न ७ हजार रुपये दर्शवून रिलायन्स कंपनीविरुद्ध ८ लाख रुपयांचा दावा दाखल होता. प्राधिकरणासमोर चाललेल्या सुनावणीत मात्र वेगळेच सत्य समाेर आले. रिलायन्स कंपनीने नेमलेले टेक्नोट्रॅक एजन्सीचे अधिकृत गुप्तहेर दीपक कुलकर्णी यांनी दाव्यासोबत जोडलेली कागदपत्रे बनावट असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले. ज्या वाहनाने धडक दिल्याचे पोलिसांनी दर्शवले, ते पोलिसांनीच उभे केल्याचे सिद्ध केले. शिवाय किसनराव व शशिकांत ज्या वाहनावरून जात होते, त्या वाहनाचा विमा नसल्याचेही प्राधिकरणासमोर पुराव्यानिशी सिद्ध करण्यात आले.

 

रिलायन्स कंपनीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी भरपाईसाठी केलेला दावा बनावट असल्याचा युक्तिवाद केला. तसेच पोलिसांनी बनावट व्यक्ती व कागदपत्रे सादर करून कंपनीची व प्राधिकरणाची दिशाभूल केल्याचा आरोपही केला. पुराव्यासाठी वाहनचालक खंडू व विधवा पत्नी सुलोचना देशमुख यांचे शपथपत्रच न्यायालयात सादर केले. त्यामुळे भरपाईच्या दाव्यासाठी बनवाबनवी केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले. त्यामुळे न्यायाधीश नावंदर यांनी दावा दाखल करणारांसह पोलिसांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

 

ते नातेवाईकच निघाले
ज्या वाहनाने देशमुख यांच्या वाहनाला धडक दिली, ते वाहन किसनराव यांच्याच पुतण्याचे निघाले. प्रत्यक्षात दुसरेच वाहन धडक देऊन निघून गेलेले होते. मात्र, खंडूच्या वाहनाचा विमा उतरवला असल्यानेच पोलिसांनी ते वाहन दाखवून विमा भरपाईसाठी बनावट कागदपत्रे जोडून खोटा दावा दाखल केला. विमा कंपनीने नेमलेले गुप्तहेर दीपक कुलकर्णी यांना दोन्ही वाहनचालकांचे नातेसंबंध लक्षात अाल्याने शंका आली. त्यामुळे त्यादृष्टीने तपास करून त्यांनी पुरावे गोळा केले. त्याचा अधिकृत अहवाल विमा कंपनीला सादर केला. त्यामुळे दावा बनावट असल्याचे सिद्ध होऊ शकले.


शहानिशा करायला हवी
मोटार वाहन अपघात झाल्यानंतर सर्रासपणे दुसरीच वाहने दर्शवून विमा कंपनीकडून भरपाईचे पैसे लाटले जातात. असे उद्योग करणारे रॅकेटच कार्यरत आहे. मात्र, विमा कंपनीने जर अधिकृत व तज्ज्ञ गुप्तहेराकडून याबद्दल शहानिशा केली, तर त्यांचेही पैसे वाचतील. विमा कंपन्यांमध्ये पैसे गंुतवणारेही सामान्य लोकच असतात. त्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या अपप्रवृत्तींनाही आळा बसेल. पोलिसांनीही असे बनावट दावे दाखल करून कायद्याची चाैकट मोडल्यास त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल.''

- दीपक कुलकर्णी, गुप्तहेर, टेक्नोट्रॅक एजन्सी.

 

 

बातम्या आणखी आहेत...