मुलाचा विरह; आई-वडील बहिणीचीही आत्महत्या;आठवड्यापूर्वी झाला होता मुलाचा खून

प्रतिनिधी

Mar 31,2019 08:46:00 AM IST

जळगाव - नऊ वर्षीय मुलाचा क्रूरपणे खून होऊन नऊ दिवस उलटले. तरी देखील पोलिसांनी त्याच्या मारेकऱ्याचा शोध घेतला नाही. त्यामुळे नैराश्य व संतापात मृत मुलाच्या आई-वडीलांसह बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे बालकाच्या खुनाचा तपास झाला नाही. त्यामुळे तिघांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईटनोटमधून हा गंभीर प्रकार समोर आला आहे.

इसम बब्बू सय्यद या मुलाची आई पिंकी बब्बू सय्यद (३८), वडील बब्बू सय्यद ( ४२) आणि बहीण स्नेहा सय्यद (१८) अशी मृतांची नावे आहेत. इसम बब्बू सय्यद हा ९ वर्षांचा मुलगा इयत्ता तिसरीमध्ये शिकत होता. इसम हा २१ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपासून बेपत्ता होता. याबाबत भडगाव पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, २२ मार्चला भडगावातील रजनीताई महाविद्यालयाच्या मागील बाजूस केळीच्या बागेत इसमचा गळा चिरून हातपाय ताेडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. या घटनेला आठवडा होऊनही त्याच्या खुनाचा तपास लागत नव्हता. याच नैराश्यातून तिघांनी आत्महत्या केली.

घटनेनंतर मुलाचा काका गायब...
इसमच्या घरी आई-वडील, बहीण व काका असे चार जण राहत होते. शनिवारी घरात तिघांनी सामूहिक गळफास घेतला. घटनास्थळी घरातून तिघांनी गळफास घेतलेल्या तीन दोऱ्या मिळाल्या तर चौथी दोरी ही गळफास घेण्यासाठी तयार केली होती. ती दोरी बेपत्ता असलेल्या सगदल सय्यद याच्यासाठीच असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, घटनेनंतर इसमचा काका गायब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

X
COMMENT