आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्याकडे की स्वातंत्र्यापासून दूर?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'माझ्याकरिता हा एक भावनिक क्षण आहे. मला असे वाटते आहे की, ज्यांचे नाव आपल्या देशाच्या आधुनिक इतिहासामध्ये नोंदवले गेलेले आहे ते मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवणारे महादेव गोविंद रानडे (माझे चुलत आजोबा शंकर पांडुरंग पंडित हे त्यांचे जवळचे स्नेही आणि सहकारी होते), या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले सर्व थोर मराठी साहित्यिक आणि ज्यांच्या लेखनामुळे भारतीय साहित्य नावाचे महान सृजनात्मक कार्य समृद्ध झालेले आहे, असे सर्व संमेलनांमध्ये सहभागी झालेले सगळेच लेखक, या सर्वांच्या छायेत मी आज उभी आहे...

 

माझ्याकरता हा क्षण भावनिक असण्याचे आणखी एक कारण म्हणजे माझे वडील रणजित सीताराम पंडित यांच्याकडून माझे स्वतःचे महाराष्ट्राशी असलेले नाते. माझे वडील संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी 'मुद्राराक्षस', कालिदासाचे 'ऋतुसंहार' आणि 'राजतरंगिणी' या तीन अभिजात संस्कृत ग्रंथांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले होते. ब्रिटिशांच्या काळात त्यांना अनेकदा तुरुंगवास झाला. त्यापैकी दोन तुरुंगवाऱ्यांमध्ये मिळून त्यांनी हे भाषांतर केले आणि ते आपले काश्मिरी श्वशुर पंडित मोतीलाल नेहरू यांना अर्पण केले. त्यांचे मेव्हणे, जवाहरलाल नेहरू यांनी त्याची प्रस्तावना लिहिली. माझ्या आई आणि वडिलांनी स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये भाग घेतला होता. या काळात माझी आई विजयालक्ष्मी पंडित हिला तीन वेळा, तर वडिलांना चार वेळा तुरुंगवास घडला. बरेलीतल्या तुरुंगामध्ये माझे वडील गंभीर आजारी पडले. त्यांना उपचार मिळाले नाहीत. तसेच त्यांच्या आजाराच्या तीव्रतेची कल्पना माझ्या आईला दिली नाही.

तरीही वडिलांनी सुटकेची याचना करण्यास नकार दिला. अखेर काही दिवसांनी माझ्या आईला फक्त २० मिनिटेच वडिलांशी भेट मंजूर केली, तीही तुरुंग अधीक्षकांच्या नजरेखाली झाली. भेटीसाठी वडिलांना जेव्हा स्ट्रेचरवर आणले, तेव्हा माझ्या आईला प्रचंड धक्का बसला. पण तुरुंगाधिकाऱ्यासमोर तिने अश्रू ढाळलेले वडिलांना आवडले नसते हे ठाऊक असल्याने तिने महत्प्रयासाने अश्रूंना बांध घातला. सुटकेची याचना करून सरकारचे उपकार न घेण्यामागची भूमिका वडिलांनी तिच्याजवळ स्पष्ट केली. अखेर काही दिवसांनी सरकारने त्यांची सुटका केली, मात्र तीनच आठवड्यांनी त्यांचा मृत्यू झाला.

 

१९४०च्या दशकात तुमच्यापैकी बहुतेकांचा जन्म झालेला नसेल. म्हणून मी तुम्हाला ही कहाणी सांगितली. त्यावरून तुम्हाला त्या काळात दु:ख भाेगलेल्या, लढलेल्या अशा लाखाे भारतीयांची कल्पना येईल. मला तुम्हाला विचारायचे आहे, आज आपल्यामध्ये स्वातंत्र्याची तीच आस आहे का? भारताच्या भावी पिढ्या स्वातंत्र्यात जगाव्या म्हणून लढत मृत्यू पत्करलेल्या स्त्री-पुरुषांचे नाव सांगण्यास आपण आज पात्र आहोत का? मी हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण म्हणजे आपली स्वातंत्र्ये आज धोक्यात आहेत. या स्वातंत्र्यांना असलेल्या धोक्यांनी माझ्या मनात एवढे वादळ उठवले आहे, की आज इथे तुमच्यासमोर काय बोलायचे याचा विचार करत असताना, सध्या भारतामध्ये जे काही चालले आहे त्याबद्दलच तुमच्याशी बोलायला हवे हे माझ्या लक्षात आले. 

 

वैविध्य हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे मूळ आहे. आपल्याकडे विविध भाषांमधले प्राचीन साहित्य आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातो, आपली वेशभूषा वेगवेगळी आहे, आपले सण वेगवेगळे आहेत आणि आपण वेगवेगळ्या धर्मांचे आचरण करतो. सर्वसमावेशकता हा आपल्या जीवनाचा भाग आहे आणि ही प्राचीन, बहुसांस्कृतिक सामाजिक व्यवस्था, जिचे नाव भारत आहे, ती म्हणजे आपले सर्वात मोठे, विलक्षण असे यश आहे, जे अन्य कुठल्याही देशाला माहीत नाही. आज मात्र धार्मिक विविधता निपटून टाकून आपल्याला एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पाहणाऱ्या धोरणामुळे आपली हीच गोष्ट धोक्यात आली आहे. हे धोरण एका फटक्यात, हिंदू नसलेल्या कोट्यवधी देशबंधूंचे आणि स्त्रियांचे घटनात्मक अधिकार काढून घेऊन त्यांना आक्रमक, बाहेरचे आणि शत्रू ठरवू पाहते आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची जडणघडण करणाऱ्या आपल्या पूर्वसुरींनी देशाकरिता धार्मिक ओळख नाकारली होती आणि भारताला एक निधर्मी लोकशाही प्रजासत्ताक देश घोषित केले हाेते. याचा अर्थ ते धर्मविरोधी होते असे नव्हे, तर आपल्यासारख्या विविध धर्म असलेल्या आणि धार्मिक प्रवृत्तीच्या देशाला, केवळ निधर्मी राज्यव्यवस्थाच एक सर्वसमावेशक, तटस्थ छत्रछाया देऊ शकेल आणि तिच्यात प्रत्येक भारतीयाला त्याच्या वा तिच्या श्रद्धेनुसार जगण्याचा व ईश्वरभक्ती करण्याचा अधिकार असेल, हे त्यांनी जाणले होते. हा निर्णय ज्यात घेतला गेला, त्या विधिमंडळामध्ये बहुसंख्य सदस्य हिंदू होते आणि तरीही त्यांनी अशी एक राज्यघटना तयार केली, जिच्या प्रस्तावनेमध्ये सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावयुक्त जीवनाची हमी देण्यात आली होती. हा उच्च आदर्श घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून निर्माण झाला होता. आज तोच उच्च आदर्श बाजूला सारण्यात आलेला आहे. अल्पसंख्याक आणि हिंदू राष्ट्राच्या उद्दिष्टाला पाठिंबा न देणारे लोक रस्त्यांवरून मोकाट फिरणाऱ्या दुराग्रही लोकांचे लक्ष्य ठरत आहेत. 

 

नुकतीच, देशाविरुद्ध कट करण्याचे खोटे आरोप करून पाच नागरिकांना अटक झालेली आपण पाहिली आहे. ख्रिश्चन चर्चेसचा विध्वंस करण्यात आला. उत्तर प्रदेशात गोहत्येच्या नावाखाली या जमावांचे हल्ले सर्रास सुरू आहेत आणि सरकारी यंत्रणा बाजूला उभ्या राहून ते पाहत आहेत. या प्रकारचा दहशतवाद जेव्हा अधिकृत ठरतो, जसे उत्तर प्रदेशात घडते आहे, तेव्हा आपण न्यायाकरिता कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? 

 

सरकारचा पाठिंबा असलेला जमावाचा हा हिंसाचार बचावहीन लोकांविरुद्ध अनेक ठिकाणी सुरू आहे आणि त्यातल्या दोषींना शिक्षा होत नाहीत. उलट बळी पडलेल्या लोकांवरच गुन्हे दाखल झाले आहेत आणि काही ठिकाणी गुन्हेगारांचे कौतुक झाले आहे. या दुःखदायक परिस्थितीची मोजावी लागणारी मानवी किंमत म्हणजे, सुरक्षित राहू शकण्याच्या, आपल्या पद्धतीने ईशप्रार्थना करू शकण्याच्या आपल्या हक्काची ज्यांना शाश्वती वाटत नाही अशा अनेक भारतीयांच्या मनामध्ये भीती आणि दुःख दाटण्याचा काळ आता आला आहे. त्यांच्यापैकी जे गरीब आणि असहाय आहेत - ज्यांना त्यांच्या गावांतून, घरांतून आणि नोकऱ्यांमधून हाकलून देण्यात आले आहे - ते लोक कामधंदा, मदत, आशा किंवा भवितव्याविना जगत आहेत. 
आपण सर्व लेखक असल्यामुळे, सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये आपल्या लेखक आणि कलावंताबाबत काय घडते त्याकडे लक्ष देऊ या. प्रश्न विचारणारे मन, सृजनात्मक कल्पनाशक्ती व अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांना सध्याच्या राजकीय वातावरणात स्थान नाही आणि जिथे विचारस्वातंत्र्य किंवा लोकशाही हक्कांप्रति आदर नसतो, तिथे लेखन ही एक धाडसी, धोकादायक कृती बनते. जगभरातल्या हुकूमशाही राजवटींमध्ये नेहमी असेच घडत आले आहे. तिथे कला ही सरकारी नियंत्रणाखाली ठेवली जाते आणि लेखकांनी जर त्यांच्या लक्ष्मणरेषेच्या बाहेर पाऊल टाकले, तर त्यांना शिक्षा होण्याची किंवा छळ होण्याची भीती असते. 

 

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गाैरी लंकेश यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. आणखी काहींना धमक्या देऊन लिहिण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे. 'तुमचे पुस्तक प्रकाशित करू नका, अन्यथा जाळून टाकू. तुमची चित्रे प्रदर्शित करू नका, अन्यथा आम्ही चित्रप्रदर्शन उद्ध्वस्त करू.' 'चित्रपटांतून अमुक संवाद बदला, अन्यथा आम्ही तुमचा चित्रपट दाखवला जाऊ देणार नाही,' अशा धमक्या दिल्या जात अाहेत. पण सर्जनात्मक कल्पनाशक्ती सरकार किंवा जमावाकडून आदेश स्वीकारू शकत नाही. आणि हे भावना दुखावणे वगैरे अर्थातच निव्वळ निरर्थक आहे. शंभर कोटी लोकांना एकाच पद्धतीने विचार करायला लावणे केवळ अशक्य आहे. प्रत्येक समाजगटाला स्वतंत्र मते असतात आणि त्याच्या स्वतंत्र संवेदना असतात. पण काय चूक आणि काय बरोबर हे भावनांवर ठरत नाही. काही बाबतीत तर भावनांना धक्का लावणे हे आपले कर्तव्यच असते. भावना दुखावण्यावर जर बंदी असती, तर आपण आजही विधवा स्त्रियांना जाळत असतो आणि कुठल्याही सुधारणा कधीच झाली नसती. संसदेमध्ये हिंदू कोड बिलावर चर्चा सुरू असताना अनेकांच्या भावना दुखावल्या, साधूंनी संसद भवनावर दगडफेक केली होती. पण जर ते विधेयक पास झाले नसते, तर हिंदू स्त्रियांना कुठलेही हक्क मिळाले नसते. 

 

आपला मात्र देश एका दुविधेत सापडला आहे. आपण कुठला मार्ग निवडावा - स्वातंत्र्याकडे की स्वातंत्र्यापासून दूर - ही गोष्ट इतर अनेक गोष्टींबरोबरच आपण काय लिहितो यावर आणि आपल्याला गप्प राहण्यास भाग पाडणाऱ्यांपुढे मान तुकवण्याचे नाकारण्यावर अवलंबून असेल. ज्यांच्या हत्या झाल्या आहेत त्यांचे स्मरण करून, वेगळे मत मांडण्याच्या हक्काकरिता उभे राहणाऱ्यांना पाठिंबा देऊन आणि भय व अनिश्चिततेच्या छायेत जगणाऱ्या, पण तरीही आपले मत व्यक्त करणाऱ्या, विरोधी मत असलेल्या सर्वांकरिता, आपण स्वातंत्र्याचा मार्ग निवडू या. 
 
यवतमाळमध्ये हाेणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद‌्घाटन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते हाेणार हाेते. मात्र आयाेजकांनी त्यांचे आमंत्रण आकस्मिकपणे रद्द केले. या संमेलनात जे भाषण त्या करणार हाेत्या ते आता ऐकता येणार नाही. त्या भाषणाचा संपादित अंश. 'बीबीसी मराठी'च्या साैजन्याने आम्ही देत आहाेत - संपादक