आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्दापुरात पाण्यासाठी उद्रेक, ग्रामसेवक मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणला....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फर्दापूर  - फर्दापुरात नागरिकांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावासाठी शासनाकडून टँकर मंजूर होऊन ही ग्रामपंचायतीकडून गावाला पुरेसा  पाणीपुरवठा होत नसल्याने गुरुवारी महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून निदर्शने केली. ग्रामपंचायत कार्यालयात एकही पदाधिकारी हजर नसल्याने संतप्त महिलांनी कार्यालयातील फर्निचर प्रांगणात फेकून तोडफोड करून संताप व्यक्त केला. एकूणच उन्हाळ्याच्या तोंडावर गावाला पाण्यासाठी वेठीस धरणाऱ्या ग्रामपंचायतीत पाण्यासाठी महिलांचा उद्रेक दिसून आला. ग्रामसेवक मुर्दाबाद... सरपंच मुर्दाबाद..च्या घोषणा देत महिलांनी फर्निचरची तोडफोड केली.   


फर्दापूरसह परिसरात या वर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.  गाव परिसरात जानेवारी महिन्यापासून ग्रामस्थांना पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहे. पंचवीस वर्षांपासून गावाला नळ योजना नाही. याचा लाभ खासगी टँकरवाले घेत असून उन्हाळ्यात सध्या चढ्या दराने व तेही अशुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातही आता टँकरची भाववाढ करण्यासाठी खासगी टँकर वाल्यांनी संप पुकारल्याने गावात पाणीबाणी निर्माण झाल्याने संतप्त महिलांनी गुरुवारी सकाळीच ग्रामपंचायत गाठली. परंतु ग्रामपंचायतीत कोणतेही पदाधिकारी हजर नसल्याने संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयातील फर्निचर बाहेर फेकून त्याची तोडफोड करत रोष व्यक्त केला.  


गावात तीस खासगी  टँकर पाणी विक्रेते उदयास आले असून ते नागरिकांना वेठीस धरून चाळीस रुपये ड्रम प्रमाणे पाण्याची विक्री करतात. शासनाने गावासाठी चार टँकर मंजूर करून ही ग्रामपंचायतकडून  गावाला पुरेसा पाणीपुरवठा  केला जात नसल्याची ग्रामस्थांची ओरड आहे.  गावातील मोजक्याच भागात पाणीपुरवठा केला जात आहे व काही ग्रामपंचायत सदस्य आपल्या सोईनुसार हे टँकर वळवत असल्याचा आरोपही होत आहे.    


घरालगत असलेल्या विहिरीत टँकर टाकले तर विद्युत मोटर लावून उपसा करून घेत आहे. यामुळे पाणीच मिळत नाही वाॅर्ड क्रमांक सहामध्ये पाणीच मिळत नाही यामुळे या वाॅर्डातील संतप्त महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. महिलांचा रोष पाहता  गावच्या सरपंच बाईंचे  सासरे तेथे आले मात्र महिलांनी सरपंचांना पाठवा, असे म्हणत ग्रामपंचायत विरोधात घोषणाबाजी केली व आम्हाला पाणी द्या, अशी मागणी करत घोषणाबाजी केली.


पाणी लवकरच देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आश्वासन 
सोयगाव येथील मुबलक पाणीसाठा असलेल्या विहिरीतून गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे गावाला भरपूर पाणी मिळेल, असे आमचे प्रयत्न चालू आहेत. - सुनील मंगरुळे, ग्रामसेवक फर्दापूर  


गावात निर्माण झालेल्या पाणी समस्येला
ग्रामपंचायत प्रशासन पुर्णपणे जबाबदार आहे. आज फक्त महिलांनी मोर्चा काढला लवकरच ग्रामपंचायतीने पाण्याची व्यवस्था  केली नाही तर नागरिक परिवारासह ग्रामपंचायत सदस्यांना घेराव घालणार आहे. - अजमद खाँ हनिफ खांॅ पठाण, ग्रामस्थ

बातम्या आणखी आहेत...