शेती / शेती गेली तळ्यात, पाण्याअभावी मोसंबीची पाचशे झाडेही तोडली; जोडव्यवसाय करत कुटुंब सावरणारा शेतकरी झाला कृषिभूषण

नावीन्यपूर्ण शेतीतून प्रेरणादायी ठरणाऱ्या शेतकऱ्यांची झाली निवड

लहू गाढे

Sep 23,2019 09:17:00 AM IST

जालना : १९८५ मध्ये धरणात पाच एकर शेती गेल्यामुळे केवळ सव्वा दोन एकर शेती राहिली. त्याच शेतीवर सहा जणांचा उदरनिर्वाह सुरु होता. याच काळात लाखो रुपये खर्चून लेकराप्रमाणे वाढवलेली मोसंबीची ५०० खोडे तोडण्याचा कटू प्रसंग १९९० मध्ये आला. यानंतरही दुष्काळ कायम पाठीशी राहिला, परंतु दुष्काळाशी दोन हात केले. २०१८ मध्ये पपईची झाडे लावली, परंतु भाव पडल्याने केवळ २ रुपये किलो भावाने अत्यंत तोट्यात पपईही विकली. यानंतरही हतबल न होता गायी, म्हशी अशी जनावरे पाळून शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देत शेती केली. जीवनात अनेकदा खडतर प्रसंग येऊनही त्या परिस्थितीशी सामना करत कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करुन कुटुंबाला सावरण्याचा एक प्रकारे सकारात्मक संदेश देणारे सिरसवाडी येथील रावसाहेब नागोराव ढगे हे जालना जिल्ह्यातून एकमेव २०१७ या वर्षातील हे शेतकरी वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. राज्यभरात अशा ६६ शेतकऱ्यांची निवड झाली आहे.


शेती व्यवसाय हा संपूर्णपणे नैसर्गिकतेवर अवलंबून आहे, परंतु केवळ नैसर्गिकतेवर अवलंबून राहिल्यास शेती धोक्यात येऊन अनेक शेतकरी आत्महत्यांचा मार्ग अवलंबतात, परंतु निसर्गाच्या हेकेखोरीचा सामना करुनही शेतकरी उत्कृष्टपणे शेती करत आहेत. उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बहुमान मिळावा. तसेच खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी शेतीनिष्ठ विविध पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले जाते. जालना जिल्ह्यातही मोसंबी, द्राक्ष, डाळिंब यासारख्या फळबागांची शेती घेणारे अनेक शेतकरी आहेत, परंतु अत्यंत कमी शेती, त्यात कुटुंब मोठे असताना दुष्काळाशी दोन हात करणारे अनेक शेतकरी आहेत. शेती करताना आधुनिकतेची कास धरुन शेती केल्यास त्याचा फायदा होतोच, हे ढगे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. त्यांची पाच एकर शेती तलावात गेली, केवळ सव्वा एकर शेती राहिली. त्यात दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा परिवार असल्यामुळे त्यांना ही शेती अत्यंत कमी होती, परंतु त्यांनी शेती करीत असताना ठिबक सिंचनाचा वापर केला. शेतीला जोडधंदा म्हणून १९८५ पासून जनावरे सांभाळणे कधीच सोडले नाही. आजही त्यांच्या घरी दोन म्हशी, दोन गायी, दोन बैल व इतर जनावरे आहेत. जनावरांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायातून त्यांना चांगलीच साथ मिळाली. शेतीतून अल्प उत्पन्न निघायचे, परंतु दुग्धोत्पादनाची त्याला जोड राहायची. असा एकत्रित त्यांचा वर्षाला दीड लाखापर्यंत उत्पन्न ठेवून दुष्काळाशी चांगलाच सामना केला आहे. आता मुलेही मोठी झाल्यामुळे त्यांना चांगला हातभार लागून शेतीनिष्ठ म्हणून त्यांची कृषी विभागाकडून दखल घेऊन त्यांची वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे. या शेतकऱ्याने सव्वा दोन एकर शेतीसाठी केवळ एक विहीर खोदून त्या विहिरीवरच ठिबक सिंचन करुन कपाशी, सोयाबीन, गहू, हरभरा आदी पिके घेतली. ही पिके घेत असताना कृषी विभागाच्या काही योजनांचाही लाभ घेतला आहे.


जालन्यातून ढगे हे एकमेव मानकरी
राज्यात कृषी, कृषीसंलग्न तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषी सेवारत्न पुरस्कार व राज्यस्तरीय पीक स्पर्धा आदी विषयांवर पुरस्कार दिले जातात. २०१७ या वर्षातील राज्यभरातून ६६ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात जालना जिल्ह्यातून रावसाहेब ढगे हे एकमेव शेतकरी आहेत.


अनेकदा दुष्काळ
१९८४ पासून शेती करीत असताना अनेक दुष्काळ पाहिले आहेत. तोंडास आलेला घासही हिरावला जात आहे, परंतु यावर रडत न बसता त्या दुष्काळाचा सामना केला आहे. नुसते शेतीवर अवलंबून न राहता जोडधंदा सोबत ठेवावा. शेती करीत असताना कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. रावसाहेब ढगे, सिरसवाडी

X
COMMENT