आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठलीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा अन् मनात नैराश्याच्या ओझ्यातूनच संपवलं जीवन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा- तालुक्यातील कोठली येथील प्रफुल पाटील नामक शेतकऱ्याने आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. 
विनाअनुदानित संस्थेत काम करुनही भागेना, म्हणून मग गावात असलेली वडीलोपार्जित शेती सुरू केली. यातही अपयशालाच हात लागला. यश येईल म्हणून उभारी धरली. यंदा पाऊस आला पीक तरारलं परंतू अवकाळीने वाहून गेलं. यातून सातबाऱ्यावर कर्जाचा आणि मनात नैराश्याचं ओझं बळावत गेल्याने अखेर शेतकऱ्याने स्वत:ला संपवल्याची हृदयद्रावक घटना कोठली (ता.शहादा) येथे घडली आहे.
प्रफुल्ल राजधर पाटील असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या आत्महत्येने शेतकऱ्यांची मनस्थिती पुन्हा समोर आली आहे. कोठली येथील प्रफुल्ल पाटील यांनी सायंकाळी आत्महत्या केल्यानंतर ओला दुष्काळ अधोरेखित झाला आहे. वडीलोपार्जित 12 एकर शेतीची मालकी असलेल्या प्रफुल्ल यांचे शिक्षण डीएड्पर्यंत झाले होते. विनाअनुदानित शाळेत काही काळ ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर त्याठिकाणी वेतन मिळत नसल्याने अखेर शेतीचा मार्ग पत्करला होता. शहादा तालुका हा तसा प्रगतीशील शेतकऱ्यांचा परिसर असल्याने आपलाही टिकाव लागेल हीच खात्री मनाशी होती. यातून वेळावेळी शेती करताना ज्येष्ठांचा सल्ला घेत शेतीला सुरुवात केली.


प्रारंभी जे पिकलं, ते मिळेल त्या भावात विकून समायोजन करण्याचा प्रयत्न केला. परंतू दरवर्षी उत्पादन आणि खर्च यांचा ताळमेळ न बसल्याने मग कर्जाचा डोलारा वाढायला लागला, सातबाऱ्यावर एकाच राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज वाढून लाखांच्या घरात गेले. यातून नैराश्य येऊन विमनस्क अवस्था झाल्याने कुटुंबीयांनी समजूतही काढली. यातून सावरत पुन्हा शेतीला सुरुवात केली. यंदा स्थिती चांगली असल्याने कर्ज मिटणार अशी आशा असताना अवकाळीने पुन्हा दगा दिल्याने नैराश्य टोकाला गेले. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर त्यांचे कुटुंबिय पूर्णपणे सुन्न झाले होते. त्यांच्या पश्चात आई- वडिल, पत्नी, 10 वर्षांची मुलगी आणि 3 वर्षांचा नकळता मुलगा आहे.