आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे जिल्ह्यातील नापिकीला कंटाळून तरूण शेकतऱ्याची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- दुष्काळी परिस्थिती व नापिकीला कंटाळून धुळे तालुक्यातील नंदाळे येथील तरुण शेतकरी किशोर पाटील यांनी विषारी द्रव औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे. या प्रकरणी धुळे तालुका पाेलिसांत नोंद करण्यात आली आहे. 


तालुक्यातील नंदाळे बुद्रूक येथील तरुण, अविवाहित शेतकरी किशोर जयवंत पाटील (वय २५) याने शेतात पेरणी केली होती; परंतु यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे किशोर यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चिंतेत होते. ते काल शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडले. शेतात जाऊन येतो, असे सांगून ते गेले होते. त्यानंतर ते परत आले नाही. सकाळीही किशोर परत न आल्यामुळे त्यांचा लहान भाऊ ज्ञानेश्वर शेतात गेला. त्या वेळी शेतबांधाजवळ किशोर बेशुद्ध स्थितीत पडल्याचे दिसून आले. या ठिकाणी जवळच मोटारसायकल लावलेली होती. त्यामुळे किशोरने काका प्रकाश पाटील व इतरांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश पाटील, अनिल पाटील, भय्या पाटील यांच्या मदतीने त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. डॉ. महेंद्र धनवे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी प्रकाश पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


गोंदूरलाही विषप्राशन 
दुसऱ्या घटनेत गोंदूर गावातील आबा नाटू पाटील (वय ५५) यांचा रविवारी सकाळी साडेसहा वाजता मृत्यू झाला. पांझरा किनारी असलेल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पाटील यांनी गुरुवारी शेतात विषारी द्रव औषध सेवन केले होते. 


किशोर कुटुंबाचा आधार 
किशोरचे वडील जयवंत यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. किशोर हा भावंडांमध्ये सर्वात मोठा होता. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. किशोर अविवाहित होता. त्याच्या पश्चात आशाबाई, लहान भाऊ ज्ञानेश्वर, बहीण प्रतिभा असा परिवार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...