आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याने थेट खजुराची शेती, गुजरातमधून रोपटे आणून खडकाळ जमिनीत फुलवली खजुराची बाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- निसर्गाचा लहरीपणा, खडकाळ व मातीपेक्षा दगडंच जास्त अशी जमीन त्यामुळे लागवडीचा खर्चही पारंपरिक पिकांच्या उत्पादनातून वसूल होईना. मात्र शेतीशिवाय तर दुसरा पर्याय नाही, म्हणून बडनेरात राहणाऱ्या व टिमटाळा येथे शेती असलेल्या एका शेतकऱ्याने थेट खजुराची शेती करण्याचा अफलातून निर्णय घेतला. हा निर्णयच त्या शेतकऱ्याने घेतला नाही तर तीन वर्षांपूर्वी गुजरातमधून खजुराचे रोपटे आणले आणि खडकाळ जमिनीत खजुराची बाग फुलवली. विशेष म्हणजे तीन वर्षांत या बागेतील एकाही झाडावर या शेतकऱ्याने कीटकनाशक किंवा रासायनिक खताचा वापर केला नाही. त्यामुळे खर्चातही बचत झाली आणि येणारे फळसुद्धा पुर्णत: सेंद्रिय राहणार आहे. 


रती लाल करसन भाई पटेल (५०, रा. नवीवस्ती बडनेरा) असे शेतकऱ्याचे नाव आहे. पटेल यांच्याकडे बडनेरापासून बारा किलोेमीटर अंतरावर असलेल्या मौजे टिमटाळा येथे वडिलोपार्जित बारा एकर शेत आहे. सुरुवातीला काही वर्ष त्यांनीही इतर शेतकऱ्यांप्रमाणे सोयाबीन, तूर, कापूस या पारंपरिक पिकांची लागवड केली. मात्र जमिनीत मातीपेक्षा दगडंच जास्त असल्याने लागवड खर्चही वसूल होईना, अखेर त्यांनी काही वर्ष शेती पडीक ठेवली. दरम्यान तीन वर्षांपूर्वी त्यांना गुजरातमध्ये राहणाऱ्या एका नातेवाइकांकडून खजुराची माहिती मिळाली. म्हणून त्यांनी खजुराची लागवड केली. गुजरातमधील कच्छमधून ही राेप त्यांनी आणली. बारा एकरांपैकी आठ एकर क्षेत्रफळात खजुराचे झाड लावलेत. दोन झाडातील अंतर २५ बाय १० फूट आहे. त्यामुळे या जागेत आंतरपीकसुद्धा घेता येते. खजुराचे झाड लावल्यानंतर चौथ्या वर्षांपासून उत्पन्न सुरू होते. त्यामुळे पटेल यांना पुढील वर्षी खजुराचे पहिले पीक घेता येणार आहे. वर्षातून एकदा झाडाला खजूर पकडतात. एकदा लावलेले झाड किमान शंभर वर्ष उत्तमपणे जगत असल्याचे पटेल यांनी सांगितले. मागील तीन वर्षांपासून पटेल यांनी खजुराच्या झाडावर कोणतेही रासायनिक खत आणि कीटकनाशकाचा वापर केला नाही. ते झाडांसाठी खराब झालेले फळ, फळांच्या साली, निंबोळी अर्क, विविध झाडांच्या पानांचा अर्क, संत्रा, केळी, सीताफळ टरफल यासह जितक्या प्रकारचे फळ आणि भाजीपाला उपलब्ध असेल त्या सर्वांचा सडवा टाकून त्याचे द्रव्य मिश्रण, बारा प्रकारचे कडधान्य आणि गुळाचे मिश्रण यासोबत शेणखताचे पाणी झाडांना देेतात, यामुळे झाडांवर दुष्परिणाम होत नाही शिवाय मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होते. तसेच या बागेत तृण आल्यास महिला वा पुरुषांच्या मदतीने ते न काढता मेंढींच्या मदतीने बाग साफ करतात. यामुळे मजुरांची कमतरता आपल्याला कधीही भासत नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खजुरांच्या झाडांना काटे असल्यामुळे कोणत्याही वन्यप्राण्यापासून झाड खाण्याची भीती नाही. त्यामुळे बागेच्या रखवालदारीचा प्रश्न मिटला. चौथ्या वर्षांपासून खजुराचे फळ येत असले तरी पाचव्या वर्षीपासून चांगले उत्पन्न सुरू होते. एका खजुराच्या झाडाला किमान वीस किलो ते एक क्विंटलपर्यंत खजूर येते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या खजूर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो, असे पटेल यांनी सांगितले. 
असे केले आर्थिक नियोजन 
खजुराचे एक रोप किमान दोनशे ते अडीचशे रुपयाचे आहे. ते लावल्यानंतर पाच वर्ष उत्पन्न मिळणार नाही. म्हणूून पटेल यांनी याच शेतात अडीच एकर मध्ये 'सीडलेस' निंबू लावले आहेत. निंबू लावल्यानंतर एका वर्षात ते विक्रीसाठी उपलब्ध होते विशेष म्हणजे हे निंबू बारमाही येत राहतात. त्यामुळे वर्षभर किमान अडीच ते तीन लाख रुपये निंबाच्या विक्रीमधून येतात. यामुळे आर्थिक घडी विस्कळीत होण्याचे कारण नाही. ही खडकाळ जमीन असल्यामुळे आंतरपीक फारसे चांगले येत नाही मात्र इतर शेतकरी खजुराच्या बागेत आंतरपीक घेऊन आर्थिक बाजू आणखी मजबूत करू शकतात. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.


 


विक्रीसाठी अनेक पर्याय 
खजुराची विक्री करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. यामध्ये ओले फळसुद्धा बाजारात विक्री केले जातात, तसेच खजूर सुकवून सुकामेवा म्हणून वापर होतो, आणि खजुराचे फळ परिपक्व झाले नसतील तर कोणत्याही 'वाइन इंडस्ट्री'ला विकता येतात.असे अनेक पर्याय असल्याचे पटेल यांनी सांगितले. 


बडनेरापासून बारा कि.मी.वर टिमटाळा येथे रतीलाल पटेल यांनी फुलवलेली खजुराची बाग. छाया:मनीष जगताप. 


शेतकऱ्यांनी खजूर बाग लावावी 
आपल्या भागातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबतच खजुराची बाग लावावी, त्यासाठी आमची जी मदत शेतकऱ्यांना पाहिजे ती आम्ही करण्यास तयार आहोत. शिवाय बाजारपेठेत विक्रीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र या शेतीला अनुदान द्यावे, कारण सद्या आपल्या राज्यात शासन खजूर शेतीला अनुदान देत नाही. रती लाल पटेल, शेतकरी, टिमटाळा. 

बातम्या आणखी आहेत...